होमपेज › Kolhapur › 117 गुंड तडीपार, 110 सराईत स्थानबद्ध करणार

117 गुंड तडीपार, 110 सराईत स्थानबद्ध करणार

Published On: Sep 05 2018 2:13AM | Last Updated: Sep 04 2018 11:30PMकोल्हापूर : प्रतिनिधी

गणेशोत्सव, नवरात्रौत्सव काळात शहर, जिल्ह्यात अजिबात गुंडागर्दी चालू देणार नाही, असे स्पष्ट करीत समाजात दहशत माजविणार्‍या 117 गुंडांना तडीपार, 110 सराईतांना स्थानबद्ध करण्यात येत आहे, असे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मंगळवारी सांगितले. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले.

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी आज सकाळी जिल्ह्यातील पोलिस ठाणेनिहाय प्रभारी अधिकार्‍यांशी संपर्क साधून प्रतिबंधात्मक कारवाईचा आढावा घेतला. जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेविषयी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याशी चर्चा करून प्रतिबंधात्मक कारवाईची माहिती दिली.

पत्रकाराशी बोलताना डॉ. देशमुख म्हणाले, गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव काळात शहर, जिल्ह्यात शांतता-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. दोनपेक्षा अधिक गुन्ह्यांचे रेकॉर्ड असलेल्या गुंडावर कडक कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यात 117 गुंडांवर तडीपारी तर 110 जणांना दोन महिन्यांच्या कालावधीसाठी स्थानबद्ध करण्यात येणार आहे. संबंधित सराईतांची यादीही तयार करण्यात आली आहे. आदेशाची तत्काळ कार्यवाही झालेली दिसून येईल, असेही ते म्हणाले.

 गणेशोत्सव काळात घरफोडी, जबरी चोरी, चेन स्नॅचिंगसह गंभीर गुन्ह्यात वाढ होते. हा अनुभव लक्षात घेऊन रात्री आठ ते सकाळी आठ या काळात पोलिसांचा अखंड बंदोबस्त राहील.यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्‍यासह कार्यकर्त्यांचीही मदत घेण्यात येणार आहे. शिवाय, पोलिस मित्रांचेही सहकार्य घेण्यात येईल. नाकाबंदी, वाहन तपासणीसह संशयास्पद व्यक्तींना ताब्यात घेवून सखोल चौकशीच्या सुचना देण्यात आल्या आहेत. असेही ते म्हणाले.

सार्वजनिक मंडळाचे पदाधिकार्‍यासह कार्यकर्त्यांची मंडप परिसरात गस्त असावी. प्रत्येक ठिकाणी पोलिसांची तातडीने उपलब्धता होईल असे नाही. देखावे पाहण्यासाठी येणार्‍या महिला, युवतींची छेडछाड होऊ नये, याची सार्‍यांनीच खबरदारी घेण्याची गरज आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनीही खबरदारी घेऊन पोलिस यंत्रणेला सहकार्य करावे, असेही त्यांनी आवाहन केले.