Fri, Apr 26, 2019 15:17



होमपेज › Kolhapur › तलाठी-लिपिकांच्या 112 जागा रिक्‍त

तलाठी-लिपिकांच्या 112 जागा रिक्‍त

Published On: Sep 09 2018 2:12AM | Last Updated: Sep 08 2018 11:56PM



कोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यात तलाठी आणि लिपिकांच्या तब्बल 112 जागा रिक्‍त आहेत. कामाचा व्याप आणि उपलब्ध कर्मचार्‍यांची संख्या यामुळे दैनंदिन कामांवर परिणाम होऊ लागला आहे. अनेक कर्मचार्‍यांकडे अतिरिक्‍त कार्यभार दिल्याने त्यांचाही ताण वाढत असल्याचे जिल्ह्यात चित्र आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर असलेल्या लिपिकांची 41 पदे रिक्‍त आहेत, त्यातच नऊ लिपिकांना पदोन्‍नती दिली जाणार आहे. यामुळे लिपिकांची 50 पदे रिक्‍त राहतील, दरम्यान अन्य जिल्ह्यांतून सात लिपिकांची कोल्हापूर जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. हे सर्व लिपिक हजर झाले तरीही 43 पदे रिक्‍तच राहणार आहेत.

जिल्ह्यात तलाठ्यांची 57 पदे रिक्‍त आहेत. येत्या काही दिवसांत 12 तलाठ्यांचे मंडळ अधिकारी म्हणून पदान्‍नती केली जाणार आहे. यामुळे तलाठ्यांची एकूण 69 पदे रिक्‍त राहणार आहेत. रिक्‍त पदांमुळे अनेक तलाठ्यांवर अतिरिक्‍त कार्यभार सोपविण्यात आला आहे. सात-बारा ऑनलाईनचे काम आणि अतिरिक्‍त कार्यभार यामुळे तलाठी मेटाकुटीला आले आहेत. त्यातच आता शेतीच्या पंचनाम्याचेही काम सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील बहुतांशी भागात 90 टक्क्यांहून अधिक शेतीचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करण्यासाठी महिनाभराचाही कालावधी जाण्याची शक्यता आहे. यानंतर पीकपाणी नोंदणीचे काम, दरम्यान निवडणुकीचे कामही सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे रिक्‍त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी होत आहे.

कर्मचार्‍यांवरचा ताण वाढला

रिक्‍त जागांमुळे तलाठी-लिपिकांवरील कामांचा ताण वाढत चालला आहे. कामांचा व्याप, वेळेत काम पूर्ण करण्यासाठी वरिष्ठांकडून होणारा तगादा, ऑनलाईनचे काम आदीमुळे तलाठ्यांना दैनंदिन कामकाज करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत.