Fri, Jul 19, 2019 22:04होमपेज › Kolhapur › 11,000 शेतकरी विजेच्या प्रतीक्षेत!

11,000 शेतकरी विजेच्या प्रतीक्षेत!

Published On: Feb 22 2018 1:25AM | Last Updated: Feb 21 2018 11:47PMकोल्हापूर : प्रतिनिधी

निसर्गाच्या कृपेने नद्या, विहिरी, तलावांत मुबलक पाणी आहे; पण ते पाणी शेतापर्यंत पोहोचवायला मुबलक वीज देण्याची व्यवस्था मात्र सरकारी यंत्रणेकडून होत नाही. डिपॉझिट भरून दोन-दोन वर्षे झाली, तरी अजून विजेची जोडणीच दिली गेलेली नाही. यंत्रणेची अवकृपा इथेच थांबत नाही, ज्यांना वीज दिली आहे तेथेही अनियमितता आणि खंडित वीजपुरवठ्याने शेतकरी हैराण झाला आहे. हे सर्व होत असताना, दरात वाढ करून शेतकर्‍यांना ‘शॉक’ देण्याचे काम मात्र महावितरणकडून इमानेइतबारे होत आहे. साधी फ्यूज गेली तरी तो खर्चही शेतकर्‍यालाच करावा लागत असताना, दरात वाढ केली जात असल्याने संताप पसरला आहे. 

12 तास अखंड वीज देण्याची घोषणा सरकारने केली; पण आता केवळ 8 ते 10 तासच वीज  मिळत आहे. तीही अखंड नसल्याने पाणी पाजण्याचे नियोजनच बिघडत चालले आहे. भारनियमनाची वेळही कायम बदलत असल्याने शेतकर्‍यांचा गोंधळ उडतो आहे. दिवसा वीज देण्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्र्यांनीच केली होती; पण आता त्याचाही विसरच पडला आहे. रात्रीच वीज पुरवली जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना शिवारातच रात्र जागून काढावी लागत आहे. 

दोन वर्षांत तिसर्‍यांदा विजेची दरवाढ प्रस्तावित करून त्याप्रमाणे वसुलीच्या नोटिसाही लागू केल्या आहेत. मार्च 2015 मध्ये 72 पैसे प्रतियुनिट असणारा वीज दर आता 1 रुपया 97 पैशांवर पोहोचला आहे. जून 2016 मध्ये 1 रुपया 16 पैसे, नोव्हेंबर 2016 मध्ये 1 रुपया 81 पैसे आणि एप्रिल 2017 मध्ये 1 रुपया 97 पैसे अशी सातत्याने वीज दरवाढ लागू केली आहे. आता पुन्हा एकदा वीज दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. वीज नियामक आयोगाच्या शिफारशीनुसार 2019 पर्यंत दुप्पट, तिपटीने वीज बिलाची आकारणी होणार आहेे. 

वीज मीटरअभावी प्रतीक्षेत असलेल्या 10 हजार कृषिपंपांना मात्र आता मीटर आल्याने तात्पुरता दिलासा मिळाला आहे; पण सर्व्हिस वायर, फ्यूज, पोल याचा प्राथमिक खर्च शेतकर्‍यांकडून घेतला जात आहे, त्याबदल्यात वीजही व्यवस्थित मिळत नसल्याने सगळे आम्हीच करायचे, मग महावितरण काय करायचे, असा सवाल शेतकरी विचारू लागले आहेत. या सर्वामुळे शेतकर्‍यांचे कंबरडेच मोडले असून, या कारभाराविरोधात आता शेतकरी रस्त्यावर उतरू लागला आहे. त्याची सुरुवात झाली असून, गुरुवारी (दि. 22) काँग्रेसतर्फे आ. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महावितरणवर मोर्चा काढून याचा जाब विचारला जाणार आहे. 

इरिगेशन फेडरेशनचा पाठिंबा
कृषिपंपधारक शेतकरी आणि पाणीपुरवठा संस्थांचे राज्याचे नेतृत्व करणार्‍या महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनने महावितरणवरील मोर्चाला आपला सक्रिय पाठिंबा दर्शवला आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकर्‍यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन करवीर तालुका अध्यक्ष आर. के. पाटील व इरिगेशन फेडरेशनचे सचिव मारुती पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. 

शेतकर्‍यांच्या नशिबी ‘वेटिंग’
36 हजार 645 इतक्या कृषिपंपांच्या जोडण्या आहेत. 8,299 जणांनी डिपॉझिट भरले आहे; पण त्यांना अजून वीज देण्यात आलेली नाही. आणखी 5,296 नव्या कनेक्शनची गरज आहे. 3003 सर्व्हिस कनेक्शन आहेत; पण त्यांचीही जोडणी झालेली नाही. आजच्या घडीला 11,302 नवीन कनेक्शन प्रलंबित आहेत.