Thu, Apr 25, 2019 15:39होमपेज › Kolhapur › त्यांनी फिरविला नशिबाचाही निकाल

त्यांनी फिरविला नशिबाचाही निकाल

Published On: Jun 09 2018 1:34AM | Last Updated: Jun 08 2018 10:56PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

दुसरीत असताना वडिलांचे छत्र हरपले... पण आईने वडिलांची आठवण होऊच दिली नाही. मिळेल ते काम करून आईने अखिलेश करोशीचा सांभाळ केला. परिस्थितीचे चटके त्याने पावलोपावली अनुभवले.त्यामुळे त्याने कष्ट आणि जिद्द सोडलीच नाही. गेल्याच वर्षी आईचे निधन झाले. शिकून अधिकारी होण्याचे स्वप्न असणार्‍या करोशीला गुरूने पाठबळ दिले. अखिलेशने दहावीच्या परीक्षेत 94.20 टक्के गुण मिळवून पाठबळ देणार्‍या गुरुजींना गुरुदक्षिणाच दिली.

अखिलेश सूर्यकांत करोशी मूळचा पाचगाव, पण आई-वडिलांचे निधन झाल्याने तो सध्या रविराज ट्रस्ट येथे राहतो. या ट्रस्टने त्याचा सांभाळ आणि पालनपोषण केले आहे. सुनील पाटील  त्याला आई-वडिलांची माय देत आहेत. अखिलेशचे प्राथमिक शिक्षण जोतिर्लिंग विद्यालयात तर आठवी ते दहावी  पर्यंतचे शिक्षण न्यू हायस्कूलमध्ये झाले. दुसरीत असताना वडिलांचे छत्र हरवलेल्या अखिलेशला आईने बळ दिले, पण आईदेखील त्याला सोडून गेली. अशा परिस्थितीत अखिलेशला शिक्षणासाठी सुनील पाटील सरांनी मदतीचा हात दिला आहेे. नियमित अभ्यास आणि चिकाटीच्या जोरावर त्याने दहावीत 94.20 टक्के गुण मिळवून यशाला गवसणी घातली. 

स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे आई-वडिलांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र परिश्रम आणि मेहनत घेण्याची आपली तयारी आहे. स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होणारच, असा विश्‍वास अखिलेश करोशी याने दैनिक ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केला.

100 नंबरी विद्यार्थिनी...

दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. पद्माराजे गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी पूर्वा सप्रे हिला शंभर टक्के गुण मिळाले आहेत. तिला 500 पैकी 485 गुण मिळाले. यात क्रीडा प्रकाराचे 15 गुण समाविष्ट आहेत. विवेकानंद शिक्षण संस्था संचलित न्यू मॉडेल स्कूलची विद्यार्थिनी श्रेया डोईजड हिला 500 पैकी 488 गुण मिळाले आहेत. 12 गुण कला प्रकाराचे असल्याने तिची गुणांची टक्केवारी शंभर झाली आहे. 

शिवानंदच्या जिद्दीला सलाम!

जन्मापासून आलेले अपंगत्व, घरची बेताची परिस्थिती, शाळेसाठी गावातून एस.टी.ने करावा लागणारा प्रवास यांसारख्या अनेक अडचणींवर मात करीत शिवानंदने लख्ख यश मिळविले व शिक्षणासाठी कष्ट उपसणार्‍या आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले.

आसुर्ले-पोर्ले येथील शिवानंद चौगले व संगीता चौगले या दाम्पत्याच्या पोटी शिवानंद व सुनील ही दोन मुले जन्माला आली. दुर्दैवाने या दोन्ही मुलांच्या नशिबी जन्मत:च अपंगत्व आले. दोघेही मूकबधिर आहेत. दोघे बंधू एकात्मिक अपंग शिक्षा योजना येथील स. म. लोहिया युनिटमध्ये शिक्षण घेत आहेत. शिवानंदने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत 82.83 टक्के गुण संपादन करून घवघवीत यश संपादन केले व वर्गात पहिला येण्याचा मान मिळविला. त्याचा लहान भाऊ सुनील हा इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे. 
शिवानंदचे कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते. वडील सदाशिव सेंट्रिग कामगार आहेत. यापूर्वी त्यांनी ऊसतोड मजुरीबरोबर अनेक कामे केली. तर आई घरकाम करते. दोन्ही मुले अपंग असतानाही त्यांनी नियतीपुढे हार न मानता कष्ट उपसण्याचे व्रत गेली कित्येक वर्षे सुरू ठेवले आहे. दोघांनीही कष्ट करून फक्त दोन मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण देणे हेच ध्येय ठेवले आहे. परीस्थितीमुळे शिवानंदला अनेकदा शिक्षणात खडतर परिस्थितीचा सामना करावा लागला. सध्या त्याला एस.टी.ने शाळेत प्रवास करावा लागतो. तसेच लहान भावालाही सोबत शाळेला ने-आण करण्याची जबाबदारी तो पार पाडत आहे. शिवानंदला यापुढे बारावीपर्यंत शिक्षण घेऊन चांगल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावयाचा आहे. त्याच्या यशाला व कुटुंबीयांच्या कष्टाला सलाम!

शर्वरीने मिळविले धवल यश

दहावीत प्रवेश घेतल्यानंतर शैक्षणिक वर्षाचे अवघे काही दिवस सुरू होतात तोपर्यंत पावसामुळे पाय घसरून शर्वरी पडली. या अपघातात तिच्या पायाला गंभीर इजा झाल्यामुळे अडीच महिने चालता येत नव्हते. आजारपणात तीन महिन्यांचा घेतलेला कालावधी, चुकलेला अभ्यास या सर्वांवर मात करीत शुक्रवार पेठेतील शर्वरीने 94 टक्के गुण मिळवून धवल यश संपादन केले. 
शुक्रवार पेठ येथील शर्वरी राजाराम जमदाडे ही पद्माराजे गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी. जुुलै महिन्यात शाळा सुटल्यानंतर पावसातून जाताना तीन मुली पाय घसरून पडल्या. त्यामधील शर्वरीला गंभीर इजा झाल्यामुळे पायात रॉड घालावे लागले. दहावीचे वर्ष त्यातच अनेक दिवस शाळेला मुकावे लागले. त्यामुळे या परिस्थितीत अनेकदा मानसिक अवस्था गोंधळाची झाली होती. मात्र, तिने सहा मैत्रिणी व शाळेतील शिक्षिका यांचे मार्गदर्शन घेत त्यावर मात केली. दररोज वर्गात शिकविले जाणारे धडे याविषयी मैत्रिणीकडून माहिती घेतली. स्वत: त्याचा घरी अभ्यास केला. अभ्यासातील अडचणीबाबत तिने शिक्षकांचे फोनवरून मार्गदर्शन घेतले. तसेच मैत्रिणींनी घरी येऊन तिला अभ्यासक्रमातील भाग समजावून सांगितला. त्यानंतर दीपावलीनंतर शैक्षणिक वर्षातील दुसरे सत्र सुरू होताच तिने मागे वळून पाहिले नाही. झोकून देऊन अभ्यासाला सुरुवात केली. पहाटे साडेचारला ती उठून अभ्यासाला सुरुवात करीत असे. रात्री 2 वाजेपर्यंत तिचा अभ्यास सुरू असायचा. जमदाडे कुटुंबीयांचे बॅगचे ताराबाई रोड येथे दुकान आहे. वडील बालकल्याण संकुल येथे नोकरी करतात. यामधून फावल्या वेळात शर्वरी घरी आईला मदत करीत असे. तिच्या यशाने समाधान झाल्याचे तिचे कुटुंबीय सांगतात.