Tue, May 21, 2019 04:05होमपेज › Kolhapur › कोल्‍हापुरातून अल्‍पवयीन मुलगी गेली एकटीच रत्‍नागिरीला

कोल्‍हापुरातून १० वर्षीय मुलगी गेली एकटीच रत्‍नागिरीला

Published On: Apr 26 2018 11:42PM | Last Updated: Apr 26 2018 11:42PMरत्नागिरी ः प्रतिनिधी

रत्नागिरी बसस्थानकात अल्पवयीन मुलगी फिरत असल्याची माहिती काही सुज्ञ नागरिकांनी रत्नागिरी शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी तिची माहिती तिला विचारली असता, अज्ञात महिलेने बसस्थानकात सोडल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्यानंतर तपासाची सूत्रे हलवण्यात आली आणि अथक प्रयत्नानंतर मुलीची तिच्या आईशी भेट घडवून देण्यात पोलिसांना यश आले.

रत्नागिरी बसस्थानकात अल्पवयीन मुलगी फिरत असल्याची माहिती काही सुज्ञ नागरिकांनी रत्नागिरी शहर पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मुलीला आपल्या ताब्यात घेऊन याची माहिती चाईल्ड लाईन या संस्थेला दिली. संस्थेच्या सदस्यांनी मुलीची विचारपूस केल्यावर तिने आपल्याला एका अज्ञात महिलेने रत्नागिरी बसस्थानकात आणून सोडल्याचे सांगितले. रत्नागिरी बसस्थानकात उतरल्यावर त्या महिलेने तिला महिला प्रसाधनगृहाबाहेर उभे करुन थोड्यावेळात येते, असे सांगितले. परंतू ती बराचवेळ झाला तरी परतली नाही, अशी माहिती त्या मुलीने दिली.

मुलीने आपले नाव स्वाती युवराज पवार(10 वर्ष, रा. चौदावी गल्‍ली, कोल्हापूर) असे सांगितले. तसेच आपल्या आई-वडिलांचे आणि भावाचे नावही तिने सांगितले. तसेच तिने आपली मावशी संगमेश्‍वर येथे राहत असल्याचेही चाईल्ड लाईनच्या सदस्यांना सांगितले. परंतू तिला घरातील कोणाचाही फोन नंबर माहित नसल्याचे तिने सांगितले. दरम्यान मुलीने दिलेल्या पत्यावरुन शहर पोलिसांनी कोल्हापूर येथील पोलिसांशी संपर्क साधला आणि रत्नागिरी चाईल्ड लाईनने कोल्हापूर येथील चाईल्ड लाईन संस्थेशी संपर्क साधून मुलीच्या घरातल्यांशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. मुलीच्या आईला ही माहिती मिळताच ती रत्नागिरीकडे रवाना झाली. रात्री उशिरा मुलीची आणि तिच्या आईची कागदोपत्री खात्री पटवून मुलीला आईच्या ताब्यात देण्यात आले. 

दरम्यान, मुलगी झोपेत असताना सकाळी 6 वाजता तिची आई नेहमीप्रमाणे कामाला गेली होती. त्या कालावधीत घरातील लाईटबिलासाठी ठेवलेले 300 रूपये घेवून ती मुलगी रत्नागिरीत आली. ही हकीकत मुलीच्या आईने पोलिसांना सांगितली. तसेच मुलगी खोटे बोलत असून  ती स्वत:च्या मर्जीने रत्नागिरीत विमानतळ परिसरात राहणार्‍या मामाकडे जाण्यास आली होती, असेही तिच्या आईने सांगितले. दरम्यान खातरजमा करण्यासाठी तिच्या मामालाही पोलिसांनी बोलावले होते. आईकडून खरी हकीकत समजल्यावर मुलगी खोटे बोलत असल्याची खात्री झाल्यावर मुलीला रात्री उशिरा तिची व तिच्या आईची कागदोपत्री खात्री पटवून मुलीला आईच्या ताब्यात देण्यात आले. 

Tags : kolhapur, ratnagiri, minor girl