Fri, Jul 19, 2019 07:38होमपेज › Kolhapur › दहावी परीक्षेत ‘चंदगडी बोली भाषेवर’ प्रश्‍न

दहावी परीक्षेत ‘चंदगडी बोली भाषेवर’ प्रश्‍न

Published On: Mar 03 2018 1:49AM | Last Updated: Mar 03 2018 12:59AMचंदगड : प्रतिनिधी

चंदगड तालुक्यातील ‘चंदगडी बोलीची’ स्वतःची वैशिष्ट्ये असून ती कोकणी, कन्नड आणि मालवणी भाषांच्या संपर्काने तयार झालेल्या या बोलीच्या संस्कृतीची ओळख इयत्ता दहावी कुमार भारतीच्या पुस्तकात आहे.  ‘चंदगडी बोली’ या उतार्‍यावरचे प्रश्‍न काल दि. 1 रोजी 11 ते 2 या वेळेत झालेल्या इयत्ता दहावीच्या मराठी विषयाच्या पेपरात आले होते. चंदगड तालुक्यातील विद्यार्थ्यांना चंदगडी भाषा सहज अवगत असल्याने या उतार्‍यावर विचारलेले प्रश्‍न सोपे गेले. 

   दहावीच्या कुमार भारती पुस्तकात ‘चंदगडची बोली’ हा उतारा चंदगड तालुक्यातीलच दौलत हलकर्णी येथील व शिवाजी विद्यापीठातील मराठीचे प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांनी लिहिला आहे. चंदगड तालुक्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना हा उतारा चंदगडी बोली भाषेत असल्याने आधीच सहज पाठ झाला होता. त्यामुळे या उतार्‍यावरचे प्रश्‍न विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा सोडवले. 

दहावीच्या कुमार भारतीच्या पुस्तकात पाच वर्षांपूर्वी चंदगडी बोलीची ओळख करून देण्याच्या उद्देशाने परिच्छेद देण्यात आला आहे. महाराष्ट्रामध्ये आजही जवळपास 50 बोली भाषा बोलल्या जातात. परंतु, त्या आपल्याला परिचित नसतात. खरे तर बोलीही विशिष्ट समाजाच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा अभ्यास करण्याचे साधन असते. परस्परांच्या परिचयासाठी, परस्परांच्या बोलींचा अभ्यास आवश्यक असतो. याच उद्देशाने इयत्ता दहावी कुमार भारती पुस्तकाचे संपादन करताना महाराष्ट्रातील काही बोलींचा परिचय करून देण्याचे ठरले. त्यापैकी चंदगडी बोली ही एक होय. पेपर सुटल्यानंतर चंदगड तालुक्यातील सार्‍याच विद्यार्थ्यांनी पाच गुणांचा उतारा पडल्याने जल्लोष साजरा केला. बोली भाषेतील उतारा वाचून त्याखालील कृती सोडवा, असा पाच गुणांचा प्रश्‍न पडला होता. सुंदराक्काचं आणि लहू गावड्याच्या कमळीचं कशावनं त् दांडगं भांडण पेटलं. असा सहा ओळींचा उतारा पडला होता. हा उतारा पेपर सुटल्यानंतर काही क्षणातच चंदगड तालुक्यातील सर्व व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवर व्हायरल झाला. त्यामुळे चंदगडी बोली भाषेचा संपूर्ण महाराष्ट्रात उजाळा झाला. या बोलीचा परिचय महाराष्ट्रात होत आहेच. त्यामुळे पुणे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात चंदगड बोलीचा नव्याने यानिमित्ताने उजाळा झाला. त्यामुळे चंदगडच्या विद्यार्थ्यांचा आनंद गगनाला भिडला.