Thu, Apr 25, 2019 16:02होमपेज › Kolhapur › शेअर मार्केटच्या नावाखाली दहा कोटींचा गंडा?

शेअर मार्केटच्या नावाखाली दहा कोटींचा गंडा?

Published On: Jul 09 2018 1:18AM | Last Updated: Jul 09 2018 1:07AMउजळाईवाडी : प्रतिनिधी

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एजंट नेमून एका स्पॉट ब्रोकर्सने सुमारे दहा कोटीला गंडा घातल्याचे समजते. त्यामुळे एजंटांचे धाबे दणाणले असून, याची दबक्या आवाजात शेअर मार्केट गुंतवणूकदारांत चर्चा सुरू आहे.

उजळाईवाडीचा रहिवासी असलेल्या शेअर ब्रोकरने आपल्या व भावाच्या नावे शेअर मार्केट गुंतवणूक करण्यासाठी शाहूपुरीत दोन ठिकाणी, तसेच राजारामपुरीत मोक्याच्या ठिकाणी कार्यालय स्थापन करून गुंतवणुकीचे काम सुरू केले. मार्केटिंगसाठी तरुणांची नेमणूक करून त्यांना मार्केटिंगसंदर्भात माहिती देऊन ग्राहकांना आकर्षित केले. या तरुणांना गुंतवणुकीमागे चांगले कमिशन मिळत असल्याने त्यांनी आपल्या ओळखीच्या, तसेच मार्केटमधील संबंधित व्यक्तींना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. वीस ते पंचवीस एजंट नेमून या बहादराने कोट्यवधीची रक्कम गोळा केली. परंतु, हे पैसे प्रत्येक व्यक्तीच्या नावे न टाकता स्वत: स्थापन केलेल्या फर्मच्या नावावर काही गुंतवणूक केली. मार्च 2017 पर्यंत हे चालू राहिले. नंतर हळूहळू तेही पैसे काढून घेतले.

ही माहिती एजंटांना समजताच त्यांनी जाब विचारला. त्यावर काही दिवसांत तुमचे पैसे दिले जातील, असे सांगण्यात आले; पण मुदत संपूनही त्या एजंट,तसेच ग्राहकांना पैसे परत केले नाहीत.

यातील काही एजंटांनी एका पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला; पण याबाबत ठोस निर्णय झालेला नाही. चोराच्या उलट्या बोंबा याप्रमाणे पैसे मागण्यास गेल्यानंतर संबंधित ब्रोकर्सच्या नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात आमच्या घरात येऊन धमकी देत असल्याची तक्रार दिली. गेली तीन महिने हे प्रकरण कोल्हापूर पोलिस ठाण्याच्या भोवती फिरत आहे; पण अद्याप या प्रकरणात संबंधित एंजटांना न्याय मिळालेला नाही. गुंतवणूकदारांच्या तगाद्यामुळे एजंट मेटाकुटीला आले आहेत.