Thu, Jun 27, 2019 09:39होमपेज › Kolhapur › कोयत्याच्या धाकाने 10 लाखांचा दरोडा

कोयत्याच्या धाकाने 10 लाखांचा दरोडा

Published On: Jun 12 2018 12:51AM | Last Updated: Jun 12 2018 12:11AMकोल्हापूर : प्रतिनिधी

ऐंशी वर्षीय वृद्धेचे हात-पाय बांधून, तोंडात बोळा कोंबून, धारदार कोयत्याच्या धाकावर दरोडा घालून बेडरूममधील रोख साडेसहा लाख रुपये, 12 तोळे दागिने असा सुमारे 10 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यानी लंपास केला. उचगाव (ता. करवीर) येथील मध्यवर्ती गणपती पार्कातील शिंदे कॉलनीत भरदिवसा हा प्रकार घडला.

अंथरुणाला खिळलेल्या लालूबाई पवार (रा. गणपती पार्क) यांनी जीवाच्या आकांताने प्रतिकाराचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांनी तोंडावर ठोसे लगावून वृद्धेला बेडखाली ढकलून दिले.

पोलिस उपअधीक्षक तिरूपती काकडे, करवीरचे पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक तानाजी सावंत, गांधीनगरचे सहायक निरीक्षक सुशांत चव्हाणसह युवराज खाडे, सर्जेराव कांबळे आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. सर्वच शक्यता गृहीत धरून चौकशी गतिमान करण्यात आली आहे, असे निरीक्षक सावंत यांनी सांगितले.

चोरीप्रकरणी सरनोबतवाडीतील दोन वीटभट्टी कामगारांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पवार यांच्या घरात नेहमीच ऊठबस करणार्‍या काही जणांकडेही चौकशी करण्यात येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गांधीनगर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. पोलिस सूत्रांकडून सांगण्यात  आले की, फिर्यादी नामदेव भगवान पवार मूळचे तुळजापूरचे आहेत. रोजंदारीसाठी हे कुटुंब उचगावातील गणपती पार्कात स्थायिक झाले आहे. पवार यांच्या मालकीच्या सरनोबतवाडीत तीन वीटभट्ट्या आहेत. नामदेव पवार यांची आई लालूबाई वगळता त्यांची पत्नी सुमन, मुलगा शंकरसह घरातील सहा, सात जण वीटभट्टीवर कामाला गेले होते. दुपारी साडेचारच्या सुमाराला आजारी आई लालूबाई बेडवर झोपलेल्या असतानाच अनोळखी व्यक्‍तीने दरवाजा ठोठावला. वृद्धेने आपण कोण आहात, अशी विचारणा केली. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही.

त्या व्यक्‍तीने पुन्हा दरवाजा जोरात ठोठावल्यानंतर मी उत्तम आहे, असे सांगून संशयित घरात  शिरला. दरवाजाच्या आडोशाला उभ्या असलेल्या वृद्धेला जोरात ढकलून दिल्याने लालूबाई भिंतीवर आदळल्या. अनपेक्षित घटनेमुळे भेदरलेल्या वृद्धेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करताच संशयिताने तोंडावर ठोसे लगावले. मफलरने वृद्धेचे हात-पाय बांधले, कापडाचा बोळा त्यांच्या तोंडात कोंबून स्वयंपाक खोलीतील कपाट फोडले.

60 हजार रुपयांवर डल्ला
चोरट्याने कपाटातील 60 हजारांवर डल्ला मारला. साहित्य,भांडी हे साहित्य विस्कटून टाकले. दागिने लपवून ठेवण्यात आले असावेत, या शक्यतेने घरातील डबे तपासण्यात आले.

12 तोळे दागिने, सहा लाखांचीरोकड लागली हाताला

चोरट्यांनी दुसर्‍या मजल्यावर मोर्चा वळविला. बेडरूममधील कपाट, तिजोरीचा दरवाजा उचकटण्यात आला. त्यामधील नेकलेस, गंठण, लक्ष्मीहार, अंगठ्या, सोन्याची साखळी असे 12 तोळ्यांचे दागिने व सहा लाखांची रोकड हाती लागली. अन्य एका कपाटातील साहित्य त्यांनी विस्कटून टाकले.

चोरीच्या घटनेनंतर काही काळात सून सुमन, नातू शंकर घराकडे परतला. वृद्धेला बांधून चोरट्याने घर साफ केल्याचे निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरड केली. शेजार्‍यांनीही घटनास्थळाकडे धाव घेतली. गांधीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

श्‍वानपथकाने हायवेवरील पेट्रोल पंपापर्यंत माग काढला

संशयितांचा माग काढण्यासाठी श्‍वानपथकाला पाचारण करण्यात आले. खाण काठावरून श्‍वानपथक पुणे-बंगळूर महामार्गावरील पेट्रोल पंपाजवळ घुटमळले.

नामदेव पवार यांचा बंगला गणपती पार्कात गजबजलेल्या वस्तीत आहे. घराला लागूनच अन्य घरे असल्याने अनोळखी व्यक्‍ती सहजासहजी परिसरात फिरकू शकणार नाहीत, अशी कॉलनीची रचना आहे. घरासमोरच गणपतीचे छोटे मंदिर आहे. चौकात लहान मुले नेहमीच खेळत असतात. बंगल्याच्या मागील बाजूस दहा फूट अंतरावर बांधकाम सुरू आहे. घटना घडली त्यावेळी सात, आठ कामगार काम करीत होते. अशा स्थितीत झालेल्या चोरीच्या घटनेमुळे वरिष्ठ पोलिस अधिकारी चक्रावले आहेत.

चौकशीसाठी दोघे ताब्यात

चोरीप्रकरणी सायंकाळी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेे. अन्य दोघांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे, असेही तानाजी सावंत यांनी सांगितले.