Thu, Jul 18, 2019 08:11होमपेज › Kolhapur › बारावीच्या दहा लाख उत्तरपत्रिका पडून!

बारावीच्या दहा लाख उत्तरपत्रिका पडून!

Published On: Mar 03 2018 1:49AM | Last Updated: Mar 03 2018 12:36AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक व कायम विनाअनुदानित शिक्षकांचा बारावी परीक्षा पेपर तपासणीवर बहिष्कार अद्यापही कायम असल्याने सुमारे दहा लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. बहिष्कारामुळे निकाल लांबणीच्या भीतीने विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासनस्तरावर अद्यापही चर्चेचे गुर्‍हाळ सुरूच आहे. 2 मे 2012 नंतर नियुक्त शिक्षकांच्या मान्यता आणि वेतन प्रश्‍न प्रलंबित आहे. 2008 ते 2011 दरम्यानच्या वाढीव पदांमध्ये मंजूर शिक्षकांच्या वेतन व मान्यता प्रश्‍न सुटलेला नाही. माहिती व तंत्रज्ञान शिक्षकांच्या मान्यता आणि वेतनाच्या प्रश्‍नाबाबत अजून ठोस आश्‍वासन शासनाने दिलेले नाही. 2011 पासूनच्या वाढीव पदांना मंजुरी मिळालेली नाही, त्यामुळे बहिष्कार कायम राहणार असल्याचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रा. अविनाश तळेकर यांनी सांगितले. 

20 टक्के अनुदान घेणार्‍या 1628 विनाअनुदानित शाळा व 2425 वर्ग तुकड्यांना प्रचलित नियमानुसार अनुदान मिळालेले नाही. प्राथमिक व माध्यमिक अघोषित शाळांची घोषणा अद्याप जाहीर झालेली नाही. शासनाच्या या गलथान कारभाराविरोधात राज्यातील 15 विनाअनुदानित शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार घातला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू आहे. यासंदर्भात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासमवेत चर्चा झाली असून, त्यांनी नेहमीप्रमाणे आश्‍वासन दिले आहे. आता ठोस लेखी आश्‍वासनाशिवाय माघार घेतली जाणार नाही. दहावीच्या परीक्षा पेपर तपासणीवरही बहिष्कार घालण्यात येणार असल्याचे राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी सांगितले.