Mon, Jun 17, 2019 15:04होमपेज › Kolhapur › ‘एटीएम’मध्ये बिघाड करून 10 लाखाला गंडा

‘एटीएम’मध्ये बिघाड करून 10 लाखाला गंडा

Published On: Sep 03 2018 1:39AM | Last Updated: Sep 03 2018 1:39AMकोल्हापूर : प्रतिनिधी

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाहूपुरी येथील ट्रेझरी शाखेतील एटीएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड करून, कार्डधारक व्यक्‍तीने एटीएममधून बँकेच्या वेगवेगळ्या नऊ खात्यांवरून 16 वेळा रकमा काढून 5 लाख 10 हजार रुपयाला गंडा घातला. रविवारी हा प्रकार उघडकीला आला. शाहूपुरी पोलिस ठाण्यात संबंधित एटीएम कार्डधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. 21 जून ते 13 जून 2018 तसेच दि. 6 जुलै 2018 या काळात हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ट्रेझरी शाखेचे मुख्य प्रबंधक जगदीश संतेबछली किचबसाप्पा (रा. श्रीनिवास हाईटस, शाहूपुरी) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले की, एटीएम कार्डधारकाने एसबीआय बँकेच्या एटीएम मशिनला विद्युत पुरवठा करणारा पॉवर स्विचकव्हर करून, मशिनमध्ये वेळोवेळी तांत्रिक बिघाड करून मशिनच्या इंटरनेटच्या माध्यमातून, पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ न देता तातडीने पैसे काढून घेतले. त्यानंतरही पुन्हा बँकेशी संपर्क साधून स्वत:च्या अकाऊंटवरून काढलेले पैसे मिळालेच नाहीत, असा कांगावा करून सदरच्या अकाऊंटवर पुन्हा पैसे जमा करण्यास भाग पाडण्यात आले. एटीएम मशिनच्या संगणकीय कार्यप्रणालीच्या यंत्रणेत स्वत:च्या फायद्याकरिता तांत्रिक अडथळे निर्माण करून बँकेच्या नऊ खात्यांवरून 16 वेळा ठिकठिकाणाहून 5 लाख 10 हजार रुपयांची रक्‍कम काढून संशयिताने फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

संबंधित एटीएम कार्डधारकाचे नाव रात्री उशिरापर्यंत निष्पन्‍न झाले नव्हते. चौकशीअंती संशयिताला अटक केली जाईल, असे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी रात्री पत्रकारांना सांगितले.