होमपेज › Kolhapur › १ रु. १६ पैसे दरानेच वीज 

१ रु. १६ पैसे दरानेच वीज 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

राज्यभरातील कृषिपंपांसाठी वीज बिलाची आकारणी 1 रु. 97 पैशांऐवजी पूर्वीप्रमाणेच 1 रु. 16 पैसे दराने होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याने सोमवारी (दि. 27) होणारे मंत्रालयावरील मानवी साखळी आंदोलन स्थगित केले आहे, अशी माहिती इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.

पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक होणार असून, तोडगा निघाला नाही, तर मानवी साखळीचे आंदोलन ताकदीने केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रा. एन. डी. पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत खा. धनंजय महाडिक, इरिगेशन फेडरेशनचे आर. जी. तांबे, विक्रांत पाटील-किणीकर, माजी आ. संजय घाटगे, बाबासाहेब पाटील-भुयेकर यांची उपस्थिती होती. इरिगेशन फेडरेशनच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील कृषिपंपधारक शेतकरी व पाणीपुरवठा संस्था 27 रोजी मंत्रालयाला मानवी साखळीचे आंदोलन करणार होते. तयारी अंतिम टप्प्यात असतानाच खुद्द मुख्यमंत्र्यांनीच ऊर्जामंत्र्यांकरवी इरिगेशन फेडरेशनला बैठकीला बोलावले. त्यानुसार आर. जी. तांबे व प्रताप होगाडे हे दि. 22 रोजी बैठकीला गेले. शिवाय, त्याच दिवशी एन. डी. पाटील यांच्याशी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोनवरून संवाद साधला. यावेळी झालेल्या चर्चेत नव्या दराविषयी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतच चर्चा होईल, तोपर्यंत 1 रु. 16 पैसे या पूर्वीच्याच दराने वीज बिले भरून घेतली जातील, असे ठरले. 

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत खा. महाडिक यांच्या पुढाकाराने इरिगेशन फेडरेशनच्या प्रतिनिधींशी चर्चा झाली. या चर्चेतही मुख्यमंत्र्यांनी स्वत: यात लक्ष घालणार असून, गुजरात दौर्‍यावरून परत आल्यानंतर बुधवारनंतर कधीही बैठक घेऊ, असे सांगितल्याचे एन. डी. पाटील यांनी सांगितले. खा. महाडिक यांनी हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले असून, मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवला, तर पुन्हा आंदोलन करणार असल्याचे सांगितले.