Mon, Jun 24, 2019 16:36होमपेज › Kolhapur › वन विभागातील १ अधिकारी, ३ क्षेत्रीय कर्मचारी निलंबित

वन विभागातील १ अधिकारी, ३ क्षेत्रीय कर्मचारी निलंबित

Published On: Dec 21 2017 1:53AM | Last Updated: Dec 21 2017 12:26AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

शासनाच्या चार कोटी वृक्षलागवडीमधील निकृष्ट कामांच्या  गैरव्यवहारप्रकरणी कोल्हापूर वन विभागातील 1 अधिकारी व 3 क्षेत्रीय कर्मचारी यांचे निलंबन करण्यात आले. कोल्हापूर विभागाचे मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील यांनी ही कारवाई केली.

करवीरचे वनक्षेत्रपाल विश्‍वजित जाधव, हातकणंगलेचे वनपाल वसंत चव्हाण व वनरक्षक मारुती ढेरे, तमदलगेच्या वनरक्षक सुप्रिया मदने यांचा कारवाई झालेल्या कर्मचार्‍यांत समावेश आहे. 4 कोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत वन विभागाकडून जिल्ह्यात विविध ठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली. यामध्ये घोसरवाड व आळते येथे वृक्षलागवड करताना निकृष्ट दर्जाचे रोपण केल्याची तक्रार वन विभागाकडे दाखल झाली होती. वृक्षारोपणासाठी गाळाची सुपीक मृदा वापरावी लागते. तसेच खड्ड्यात शेणखत काही प्रमाणात वापरावे लागते. तक्रारीनंतर कामाची चौकशी झाली. यामध्ये प्राथमिक अहवालात ही कामे निकृष्ट झाल्याचे काही ठिकाणी दिसून आले आहे. 

निकृष्ट प्रतीची माती वापरण्यात आली आहे. तसेच काही खड्ड्यांत शेणखत टाकलेले नाही. या कामात आर्थिक नियोजन व्यवस्थित करण्यात आलेले नाही, असे प्राथमिक चौकशीत दिसून आले आहे. याबाबत कोल्हापूर विभागाचे मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील म्हणाले, याबाबतची नोटीस संबंधित कर्मचार्‍यांना लवकरच दिली जाणार आहे. तसेच खात्यांतर्गत चौकशी केली जाणार आहे. कोल्हापूर विभागात याबाबत कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. सांगली व सातारा विभागात याबाबत आता चौकशी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.