Mon, Jul 22, 2019 14:04होमपेज › Kolhapur › ऑनलाईन सात-बारासाठी 1 ऑगस्टची डेडलाईन?

ऑनलाईन सात-बारासाठी 1 ऑगस्टची डेडलाईन?

Published On: May 30 2018 2:18AM | Last Updated: May 30 2018 12:29AMकागल : बा. ल. वंदूरकर

शंभर टक्के संगणकीकृत सात-बारा झाल्याचे अनेक वेळा जाहीर करून देखील अद्यापही शासकीय पातळीवर ऑनलाईन सात-बारासाठी सतत अखेरच्या तारखा जाहीर केल्या जात आहेत. अजूनही ऑनलाईन कामाचा निपटारा झालेला नाही. आता 1 ऑगस्ट महसूल दिनाचा मुहूर्त साधला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गरजेच्या कामासाठी लागणार्‍या सध्याच्या सात-बारावर क्षेत्रफळाची बेरीज मिळत नाही. क्षेत्राची खात्री करूनच पुढील व्यवहार करण्यात यावे, अशी सूचक सूचना करणारी टीप टाकण्यात येत आहे. यासर्व प्रकारामुळे शेतकर्‍यांना परिपूर्ण सात-बारा मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत येऊ लागला आहे.

महसूल विभागाने राज्यातील सर्व जमिनींचे सात-बारा ऑनलाईन करण्याचे 2016 साली जाहीर केले. त्यानंतर ऑनलाईलन सात-बारा देण्याच्या अनेक वेळा अनेकांनी घोषणा केल्या. मात्र, अद्याप यश आले नाही. याबाबत अनेक वेळा अंतिम तारखा जाहीर होऊनही कोणी गांभीर्याने  तारीख पाळली नाही.

1 मे महाराष्ट्र दिनी संगणकीकृत सात-बारा देण्यात येईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. मात्र, कामे पूर्ण झाली नाहीत. त्यानंतर 20 मे ही तारीख देण्यात आली. त्या दरम्यान देखील कामे पूर्ण झाली नाहीत. आता मे महिना संपत आला तरी देखील अद्याप ऑनलाईन होण्याची कोणतीच चिन्हे सध्या दिसून येत नाहीत. त्यामुळे आता 1 ऑगस्ट महसूल दिन उजडतोय की काय? अशी शंका व्यक्त होत आहे. 

ऑनलाईन सात-बाराची कामे सुरू झाल्यापासून काम करणार्‍या महसूल कर्मचार्‍यांना त्रास देणारा आणि सतत डाऊन होणारा सर्व्हर अद्यापही डाऊनच राहत आहे. याकडे कामे संपत आली तरी देखील कोणी लक्ष दिले नाही. काम करणार्‍या महसूल कर्मचारी आणि अधिकारी यांना याचा फटका बसला आहे.

कामे पूर्ण करण्यासाठी तलाठी, मंडल अधिकारी, महसूल नायब तहसीलदार गेल्या अनेक दिवसांपासून दिवस-रात्र महसूल कार्यालयात बसून काम करीत आहेत. झालेल्या चुका दुरुस्त करीत आहेत. सध्या लहान गावे पूर्ण झाली असली तरी मोठी गावे आणि शहरातील सात-बारामधील चुका प्रतीक्षेतच आहेत. शंभरहून अधिक नावे असलेल्या एका-एका गटामधील दुरुस्तीची कामे सध्या सुरू आहेत. काही गावे संपूर्ण ऑनलाईन झाली असली तरी प्रत्यक्षात ऑनलाईन सात-बारा उतारे दिले जात नाहीत.

शेतकर्‍यांना विविध कामांसाठी सात-बाराच्या उतार्‍याची गरज भासत आहे. खरीप पेरणीसाठी कर्ज काढण्याकरिता कर्ज प्रकरणात सात-बारा आवश्यक असल्यामुळे जमीन खरेदी-विक्रीच्या कारणासाठी देखील सात-बारा गरजेचा असल्याने सात-बारा काढण्यात येतो. मात्र, त्रुटी व टिपेमुळे अडचणी वाढत आहेत.

पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष
ऑनलाईन सात-बाराची कामे करणार्‍या सॉफ्टवेअर कंपनीमुळे देखील महसूल कर्मचार्‍यांना आतापर्यंत त्रास सहन करीत कामे करत असताना शासनाने अनेक वेळा घोषणा करून देखील महसूल कर्मचार्‍यांना पायाभूत सुविधा देण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. लॅपटॉपपासून ते लॅपटॉपची वाढीव रॅम, प्रिंटर इंटरनेट सोयी व इतर महत्त्वाचे साहित्य देण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष करून केवळ काम करण्याचा तगादा लावण्यात येत आहे.