Tue, Jul 14, 2020 09:55होमपेज › Kolhapur › अंबाबाई चरणी मे मध्ये 1.7 कोटींचे दान

अंबाबाई चरणी मे मध्ये 1.7 कोटींचे दान

Published On: Jun 13 2019 1:33AM | Last Updated: Jun 13 2019 1:08AM
कोल्हापूर : प्रतिनिधी 

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दानपेटीत निव्वळ मे महिन्यात 1 कोटी 7 लाख 29 हजार 430 रुपयांचे दान जमा झाले आहे. देवीच्या खजिन्यात एका महिन्यात इतक्या मोठ्या रकमेचे दान जमा होण्याची ही पहिलीच वेळ असून, मे महिन्यातील हे आजवरचे सर्वाधिक उत्पन्‍न असल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले. 

महाराष्ट्रातील धार्मिक पर्यटनाच्या यादीत करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर अग्रस्थानी आहे. श्री क्षेत्र पंढरपूर, शिर्डी आणि करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात धार्मिक पर्यटक मोठ्या संख्येने येतात. यावर्षी मार्च आणि एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुका असल्याने या काळात पर्यटक भाविकांची संख्या कमी दिसून आली; पण मे महिन्यात मात्र धार्मिक पर्यटकांची शहरात खूपच वर्दळ वाढली होती. मे महिन्यात दरदिवशी कमीत कमी 50 हजार भाविक भेट देत होते. सुट्टीच्या हंगामात सकाळी सहापासून रात्री उशिरापर्यंत भाविकांच्या दर्शन रांगा लागल्याचे चित्र होते.

सुट्टीच्या हंगामात म्हणजेच  निव्वळ मे या एका महिन्यात एक कोटींहून अधिक रक्‍कम दानपेटीत जमा झाल्याची ही पहिलीच वेळ असून, गेले तीन दिवस दानपेटीतील रक्‍कम मोजण्याचे काम सुरू होते. यामध्ये दि. 10 रोजी 34 लाख 58 हजार 94 रुपये, दि. 11 रोजी 43 लाख 37 हजार 804 रुपये आणि बुधवार दि. 12 रोजी 29 लाख 33 हजार 532 रुपयांची मोजदाद करण्यात आली. एकूण 1 कोटी 7 लाख 29 हजार 430 रुपये दानपेटीत जमा झाल्याची नोंद करण्यात आली आहे. देवस्थानच्या दानपेटीत एका महिन्यात इतकी मोठी रक्‍कम प्रथमच जमा झाल्याचे सांगण्यात आले. तीन दिवसांत देवस्थान समितीकडून मंदिरात ठिकठिकाणी बसवण्यात आलेल्या 17 पेट्यांमधील रक्‍कम मोजण्यात आली. गरुड मंडपात तीन दिवस पैसे मोजण्याचे काम सुरू होते.

* मे महिन्यातील सर्वाधिक उत्पन्‍नाची नोंद
* तीन दिवस सुरू होते रक्‍कम मोजण्याचे काम