होमपेज › Kolhapur › ...तर आमदारकीचा राजीनामा

...तर आमदारकीचा राजीनामा

Published On: Jul 28 2018 1:33AM | Last Updated: Jul 28 2018 12:42AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

आमदारांच्या राजीनाम्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सुटणार असेल तर आम्ही राजीनामा देण्यास तयार आहे, असे आमदार हसन मुश्रीफ यांनी आज दसरा चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाच्या भेटीवेळी सांगितले. 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणजे मुक्त विद्यापीठच आहेत, ते काहीही बोलू लागले आहेत, नंतर माफी मागण्याचा त्यांचा गुण मात्र चांगला आहे, अशी टीकाही मुश्रीफ यांनी यावेळी केली. 
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गेल्या चार दिवसांपासून ऐतिहासिक दसरा चौकात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आजही विविध पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भेट देऊन मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला पाठिंबा दिला. आज मुश्रीफ यांच्यासह आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू लाटकर, आर. के. पोवार, नगरसेवक प्रा. जयंत पाटील, विनायक फाळके, माजी नगरसेवक आदिल फरास यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. 
यावेळी मुश्रीफ म्हणाले, काँगे्रस आघाडी सरकारने सत्तेवर असताना मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मागासवर्गीय आयोगाकडे पाठवण्यात आला. या आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष बापट यांनी हा निर्णय घेता येणार नाही असे कळवले. त्यानंतर केतन तिरोडकर या व्यक्तीने न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिले, तेव्हापासून हा निर्णय प्रलंबित आहे. भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली, पण गेल्या चार वर्षांत सरकारने या समाजाची फसवणूकच केली आहे.

ते म्हणाले, मराठा समाज हा लोकसंख्येने जरी मोठा असला तरी त्यामध्ये गरीब परिस्थिती जीवन जगणार्‍यांची संख्या जास्त आहे. मराठा समाजाचे लोक राजकारणात जास्त असतील, पण नोकरीत त्यांची संख्या कमी आहे. म्हणून आरक्षणाच्या मागणीसाठी हा समाज एकवटला; पण ज्या ज्यावेळी या समाजाने मोर्चा काढला, आंदोलन केली, त्यावेळी या समाजातच कशी फूट पडेल यासाठी सरकारने प्रयत्न केले. त्यामुळे आरक्षणाचा निर्णय लांबत गेला. मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी अलीकडेच 76 हजार पदांची भरती जाहीर केली, त्यात मराठा आरक्षण नाही म्हटल्यावर या समाजाच्या संतापाचा कडेलोट झाला. त्यातून हे आंदोलन सुरू झाले. मूक मोर्चाची नोंद ग्रिनिज बुकात झाली, त्याचे मोठे कौतुक झाले. लाखो लोक रस्त्यावर आल्यानंतरही एक दगड पडत नाही, घोषणा दिली नाही तोच समाज आज ठोक आंदोलनाच्या निमित्ताने रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळे शासनाने त्वरित याचा निर्णय घ्यावा. 

राज्यात आमदारांच्या राजीनाम्याचे सत्र सुरू असल्याबाबत बोलताना ते म्हणाले, आमदारांच्या राजीनाम्यामुळे हा प्रश्‍न सुटणार असेल तर आम्ही कधीही राजीनामा द्यायला तयार आहे. आजच कोल्हापुरात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार येत आहेत, त्यांच्याशी याबाबत चर्चा केली जाईल. पालकमंत्री पाटील यांनी या आंदोलनात पेड आंदोलक घुसल्याचा आरोप केला. मुख्यमंत्र्यांनी पंढरीच्या वारीत लोक साप सोडतील, असा संशय व्यक्त केला, ही वक्तव्ये चांगली नाहीत. पालकमंत्री म्हणजे मुक्त विद्यापीठच आहे. ते अलीकडे काहीही बोलत सुटले आहेत, पण नंतर माफी मागण्याचा त्यांचा गुण चांगला आहे, असा टोलाही मुश्रीफ यांनी लगावला.