होमपेज › Kolhapur › कृषिकर्ज वितरणात ‘उतार्‍या’चा अडथळा

कृषिकर्ज वितरणात ‘उतार्‍या’चा अडथळा

Published On: Jul 27 2018 1:25AM | Last Updated: Jul 26 2018 11:18PMबेळगाव : प्रतिनिधी

शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सवलतीच्या दरात कर्जपुरवठा सुरू केला आहे. परंतु सातबारा उतार्‍यावर बोजा नोंदणीसाठी शेतकर्‍यांना तिष्ठत बसावे लागत आहे. यामुळे बेळगाव तालुक्यातील शेतकर्‍यांना मागील महिनाभरापासून बोजा चढविण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

सरकारने महसूल विभागाचे संगणकीकरण केले आहे. यामुळे उतारा काढण्यापासून नोंदणीपर्यंत सर्वत्र ऑनलाईन पद्धत अवलंबविण्यात येत आहे. परंतु, या प्रणालीत वारंवार तांत्रिक दोष निर्माण होत असल्याने याचा फटका शेतकर्‍यांना बसत आहे.

खरीप हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज वितरीत करण्यात येते. याची प्रक्रिया सुरू झाली आहे. खरीप पेरणी हंगाम अंतिम टप्प्यात आहे. तरीदेखील तालुक्यातील शेतकर्‍यांना सवलतीच्या दरातील कर्जाचा लाभ मिळेनासा झाला आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँक कृषी पत्तीन बँकांच्या माध्यमातून कर्ज वितरण करते. परंतु कर्ज मिळविण्यासाठी शेतकर्‍याच्या उतार्‍यावर बोजा नोंद होणे आवश्यक असते. त्याशिवाय शेतकर्‍यांना कर्ज मंजूर करण्यात येत नाही. यामुळे शेतकरी हवालदिल बनला आहे.

महसूल खात्याचे सॉफ्टवेअर संथगतीने कार्यरत असल्याने शेतकर्‍यांचा बोजा नोंद होताना अडचण निर्माण होत आहे. याबाबत ऑपरेटरकडून बोजा चढविण्यासाठी अर्ज केलेल्यांची दिशाभूल केली जात आहे. बंगळूरहून सॉफ्टवेअर बंद असल्याने अडचण निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी मागील महिनाभरापासून अनेक शेतकर्‍यांना धावपळ करावी लागत आहे.
याबाबत संबंधित कर्मचार्‍यांकडे विचारणा केली असताना यापूर्वी बोजा नोंदणी प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होत होती. परंतु, बोजा नोंदणी  ऑनलाईन पद्धत सुरू असल्याने  विलंब होत असल्याचे सांगितले. सॉफ्टवेअर सुरळीत सुरू आहे, मात्र प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याचा खुलासा केला.

शेतकरी अडचणीत

बेळगाव तालुक्यात 32 कृषी पत्तीन बँका आहेत. त्यांच्यामाध्यमातून शेकडो शेतकर्‍यांना अर्ज वितरण करण्यात येते. मात्र, सध्या उतार्‍यावर बोजा नोंदविण्यास टाळाटाळ सुरू असल्याने खरीप हंगामात कर्जाचा लाभ घेताना शेतकर्‍यांना अडचण येत आहे. सध्या पेरणी हंगाम अंतिम टप्प्यात असून आंतरगत मशागत आणि इतर कामासाठी कर्जाची आवश्यकता आहे.