Thu, Jun 20, 2019 01:00होमपेज › Kolhapur › ‘शाहूनगरी’ कोल्हापूरची घडणार अनोेखी सफर

‘शाहूनगरी’ कोल्हापूरची घडणार अनोेखी सफर

Published On: Jun 22 2018 2:08AM | Last Updated: Jun 22 2018 1:38AMकोल्हापूर : सागर यादव 

राधानगरी धरण बांधून कोल्हापूरला सुजलाम-सुफलाम करणारी दूरदृष्टी, व्यापार-उदीम वाढीसाठी रेल्वेसारख्या आधुनिक दळणवळणाची सुविधा, जाती-धर्माच्या जोखडात गुरफटलेल्या लोकांना शिक्षणाने खर्‍या अर्थाने शहाणे करण्यासाठी  लोकराजा राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी केलेल्या लोकोपयोगी आणि दूरदृष्टीच्या अद्वितीय कार्याची माहिती भावी पिढीला व्हावी, या उद्देशाने सफर ‘शाहूनगरी’ कोल्हापूरची हा अनोखा उपक्रम शिवराज्य मंचतर्फे आयोजित करण्यात आला आहे. 

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार, दि. 26 जून रोजी हा उपक्रम होणार आहे. कोल्हापूरचे भाग्यविधाते असणार्‍या लोकराजा शाहूंच्या जयंतीदिनी सकाळी लक्ष्मी विलास पॅलेस येथे अभिवादन, दुपारी दसरा चौकात अभिवादन, मिरवणूक आणि सायंकाळी व्याख्यान व पुरस्कार वितरण सोहळा असे पारंपरिक पध्दतीचे स्वरूप असते. यानंतर वर्षभर मात्र शाहू कार्याचा कोल्हापूरकरांना विसर पडतो. शाहूंच्या कार्याची साक्ष देणारे खासबाग कुस्ती मैदान, पेठापेठातील तालीम आखाडे, रंकाळा तलाव परिसरातील धुण्याची चावी, कळंबा तलाव परिसर, विविध जाती-धर्मीयांच्या शिक्षणासाठी उभारलेली बोर्डिंग्ज अशा विविध वास्तू दुर्लक्षितच असतात. 

शाहू कार्याची महती सांगणार्‍या या वास्तूंच्या जतन-संवर्धन-संरक्षणासाठी कोणतेही प्रयत्न होत नसल्याचे वास्तव आहे. महापालिकेने तयार केलेल्या हेरिटेज (वारसा स्थळ) यादीत या वास्तूंचा समावेश असूूनही प्रत्यक्षात त्या दुर्लक्षीत असल्याचे चित्र आहे. या गोष्टींकडे मनपा व जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे यासाठी शिवराज्य मंच तर्फे या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांना राजर्षी शाहूंच्या संबंधित वास्तूंची माहिती, त्यांचा सविस्तर इतिहास, सद्यस्थिती यांची माहिती देण्यात येणार आहे. भविष्यात ही मोहीम अधिक व्यापक करण्याचा त्यांचा मानस आहे. या शाहू कार्यात प्रत्येकाने कर्तव्य भावनेतून सहभागी होण्याचे आवाहन शिवराज्य मंचतर्फे करण्यात आले आहे.

अशी असेल शाहूनगरीची सफर...

शिवराज्य मंचतर्फे शाहू जयंतीदिनी (दि.26 जून) सकाळी 8 वाजता, कागल पोलिस स्टेशनपासून उपक्रमास सुरुवात होईल. सफरीदरम्यान लक्ष्मी विलास पॅलेस (शाहू जन्मस्थळ), नवीन राजवाडा, पंचगंगा नदी घाट, शिवछत्रपती व रणरागिणी ताराराणी मंदिर, गंगाराम कांबळे स्मारक, दसरा चौकातील ऐतिहासिक स्मारक, विविध जाती-धर्मीयांची वसतिगृहे, ऐतिहासिक रेल्वे स्टेशन, साठमारी, शाहू वैदिक स्कूूल, जुना राजवाडा, शाहू मिल या वास्तूंना भेटी देऊन तिथला इतिहास जाणून घेण्यात येणार आहे.