Tue, Jul 16, 2019 09:36होमपेज › Kolhapur › उद्योगांना मिळणार ‘रेडीमेड’ अभियंते

उद्योगांना मिळणार ‘रेडीमेड’ अभियंते

Published On: Aug 27 2018 1:14AM | Last Updated: Aug 27 2018 1:02AMकोल्हापूर : प्रवीण मस्के

रोजगाराच्या संधी वाढविणे आणि उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ पुरवणे, यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी मॉडेल इंटर्नशिप लागू केली आहे. यामुळे उद्योग क्षेत्राला गुणवत्तापूर्ण कुशल ‘रेडीमेड’ अभियंते  मिळणार आहेत. यावर्षीपासून ही इंटर्नशिप सुरू होणार आहे.

दिवसेंदिवस उद्योग क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. त्याच्या तुलनेत उपलब्ध अभ्यासक्रमातून उद्योग क्षेत्रांना अपेक्षित मुनष्यबळ उपलब्ध होत नाही. यादृष्टीने ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या वतीने (एआयसीटीई) नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत. शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात 36 अभियांत्रिकी महाविद्यालये असून, चार वर्षांसाठी सुमारे 80 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

या वर्षीपासून विद्यार्थ्यांना इंटर्नशिप अनिवार्य करण्यात आली आहे. दुसर्‍या, चौथ्या आणि सहाव्या सत्रानंतर अनुक्रमे 4 ते 6 व 6 ते 8 आठवड्यांची इंटर्नशिप विद्यार्थ्यांना अनिवार्य केल्यामुळे नवीन अभियंत्यांच्या प्रशिक्षणाचा खर्च व वेगळी शोधमोहीम वाचणार आहे. 

इंटर्नशिपला वेगळे गुण असल्यामुळे विद्यार्थीसुद्धा प्रामाणिकपणे व मन लावून उपक्रम करतील. अनेक तंत्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थी शेवटच्या सत्राला असताना इंटर्नशिप करतात किंवा थेट प्रोजेक्ट सादर करतात. यापुढे असे करता येणार नाही. विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी इंटर्नशिप तीन प्रकारांत विभागण्यात आली आहे.  

अभियांत्रिकीच्या एवढ्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी तेवढ्या कंपन्या उपलब्ध होणार का? आणि त्यांच्याकडूनही तसा सकारात्मक प्रतिसाद मिळणार का? हे उपक्रमासमोरील महत्त्वाचे आव्हान आहे. शासन, शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्रांनी मिळून पुढाकार घेतल्यास हे शक्य होईल. महाविद्यालये व अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने  वेगवेगळ्या कंपन्यांबरोबर केलेले सामंजस्य करार उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. हे शक्य झाल्यास गुणवत्तापूर्ण व प्रात्यक्षिक आधारित शिक्षणाची महत्त्वपूर्ण नांदी ठरेल.