Tue, Nov 20, 2018 04:07होमपेज › Kolhapur › कोल्‍हापुरात नवरा-बायको झाले 'पीएसआय'!

कोल्‍हापुरात नवरा-बायको झाले 'पीएसआय'!

Published On: Jun 22 2018 2:08AM | Last Updated: Jun 22 2018 2:02AMसरुड : वार्ताहर

थेरगाव (ता. शाहूवाडी) येथील सचिन आनंदा रेडेकर व आरती सचिन रेडेकर या पती -पत्नीसह शुभांगी बाजीराव रेडेकर व कुमार नाईक या एकाच गावातील चौघा जणांनी पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत यश संपादन करत गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. 

सचिन रेडेकर व आरती रेडेकर यांचे एक महिन्यापूर्वीच लग्न झाले आहे. या यशाने त्यांच्या कुटुंबीयाचा आनंद द्विगुणीत झाला आहे. सचिन रेडेकर यांचे प्राथमिक शिक्षण थेरगाव, तर माध्यमिक शिक्षण विश्‍वास विद्यानिकेतन चिखली येथे झाले. दापोली विद्यापीठातून बी.एस्सी.चे शिक्षण घेत असतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासास सुरुवात केली होती. त्यांच्या पत्नी आरती रेडकर या सध्या हुपरी पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. लग्नाअगोदरपासूनच त्यांनी नोकरी करत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. या पती-पत्नीला यापूर्वी दोनवेळा स्पर्धा परीक्षेमधील यशाने हुलकावणी दिली होती. परंतु, दोघांनीही या अपयशामुळे खचून न जाता मोठ्या जिद्दीने या परीक्षेला सामोरे जात अखेर तिसर्‍या प्रयत्नात  यश पादाक्रांत केले. 

शुभांगी बाजीराव रेडेकर या सध्या राज्य गुप्त वार्ता विभागात गुप्त वार्ता अधिकारी म्हणून 2011 पासून कार्यरत आहेत. त्यांचे सासर सरुड हे असून अडीच वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले आहे. लग्न होऊनही त्यांनी आपली स्पर्धा परीक्षेत यश संपादन करण्याची जिद्द सोडली नाही. प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी पहिल्या प्रयत्नाच यशाला गवसणी घातली. त्यांना आई, वडिलांसह पती सतीश तडावळेकर सासरे सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी सदाशिव तडावळेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

कुमार नाईक हे सध्या मुंबई पोलिस दलात चालक या पदावर कार्यरत आहेत. पोलिस खात्यांतर्गत झालेल्या पोलिस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेला सामोरे जात त्यांनी हे यश संपादन केले आहे. या यशामुळे त्यांनी चालक ते फौजदार अशी गरुडभरारी घेतली आहे. 

थेरगाव गावच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळी गावातील चौघांची फौजदारपदी निवड झाल्याने ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.