कोल्हापूर : प्रतिनिधी
महावितरण कंपनीचे पुणे विभागाचे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी कोल्हापूर दौर्यात महावितरण कंपनीच्या अधिकार्यांबाबत केलेल्या वक्तव्याच्या आणि अधिकार्यांना पाठविलेल्या सक्तीच्या रजेच्या निषेधार्थ वीज कंपन्यांतील सर्व संघटनांतर्फे बुधवारी काम बंद आंदोलन करण्यात आले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे ग्राहकांची मात्र गैरसोय झाली.
ताकसाडे यांनी कोल्हापूर झोनमध्ये बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी लातूरशी कोल्हापूरची तुलना करून येथील अधिकार्यांच्या कार्यक्षमतेवर शंका व्यक्त केल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. कोल्हापुरात मर्यादित वीजवापर, वीज चोरीचा अभाव, गळतीचे प्रमाण कमी अशा कारणांमुळे विजेचा वापर कमी दिसतो. मात्र, ताकसांडे यांनी हा वापर एवढा कमी कसा, अशी विचारणा करून लातूरपेक्षा चांगला परफॉर्मन्स नसल्याचा आणि येथील आकडेवारी बोगस असल्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही, तर निवृत्तीच्या उंबरठ्यावर असणार्या कार्यकारी अभियंत्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांतील दोन कार्यकारी अभियंत्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
कारवाईमुळे महावितरण कर्मचारी, अधिकार्यांत असंतोष पसरला आहे. तातडीने सर्व कामगार संघटनांनी एकत्र येऊन काम बंद आंदोलन सुरू केले. पहिल्या टप्प्यात इचलकरंजी, तर दुसर्या टप्प्यात कोल्हापूर असे सर्वच ठिकाणी काम बंद आंदोलन करून प्रशासनाचा निषेध केला आहे. अशाच पद्धतीने कारवाई सुरू राहिली, तर भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
दुपारी गेटमिटिंग घेऊन विविध संघटना प्रतिनिधींनी आपल्या भावना व्यक्त करून या कारवाईचा निषेध केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात प्रामाणिक ग्राहक आहेत. वीजचोरी नाही, वसुलीचे प्रमाण चांगले असताना परफॉर्मन्स चांगला कसा नाही, असा संतप्त सवाल कामगार नेत्यांनी केला आहे. या आंदोलनात अधिकारी संघटना, एसईए, वर्कर्स फेडरेशन, इंटक फेडरेशन, बीएमएस तांत्रिक कर्मचारी संघटना, मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना, बहुजन वीज कर्मचारी फोरम आदीसह सर्वच संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.