मन की बात : वेलकम होम

Published On: Jun 20 2019 2:06AM | Last Updated: Jun 19 2019 8:49PM
Responsive image

स्नेहल अवचट

 


घर कोणाचेही असो, दार उघडल्यावर जर भरभरून  तर कधी मनापासूनच स्मितहास्याने आपले स्वागत झाले की तिथे गेल्याचे समाधान असते रोज ऑफिसमधून घरी आल्यावर कोणी  जस्ट  स्माईल जरी दिले तरी दिवसाचा शिणवठा पळून जातो. कारण ते आपले, आपल्या जिवलगांचे घर असते. जिथे आपला आनंद, समाधान,  शांत झोप हे सगळे मनापासून आपली वाट पाहत असतात.

तर नुकताच  ‘वेलकम होम’ हा सुमित्रा भावे यांचा अफलातून  सिनेमा बघितला. तुमचा आमच्या दैनंदिन आयुष्यातील विषय सुयोग्यरित्या मांडला आहे.लहानपणापासूनच मुलगी ही परक्याचे धन तर सासरची ठेव असे म्हणून खा, प्या, खेळा, मजा करा व नहाण आले की उजवून टाका, हाच मानस असायचा. मग तो नवरा म्हातारा इतुका न लहान अवघे पाऊणशे वयमान, असापण असायचा. लग्न झाले की माहेरला बोल लागेल असे वागायचे नाही हेच तिच्याकडून वदवून घेतले जायचे. राब राब राबून, कष्ट करत मिळेल ते खाऊन  त्या वातावरणात स्वतःला सामावून घ्यायचे. बरं, तिकडच्या विरोधात माहेरी फार काही बोलायचेपण नाही. कारण सासू ही छळ करणारच. नवरा अरेरावी करणारच हे गृहीतच असायचे. कारण माहेरीपण आजी, आत्या, आई, काकू, ताई या सगळ्या हेच सहन करतात असेच बघण्याची सवय.सणवार, लग्नकार्य यासाठी चार दिवस पाहुणचार घेऊन परत बिनबोभाट आपल्या घरी जायचे हाच शिरस्ता. मनापासून तिला ते घर , ती माणसे आपली वाटो अगर न वाटो. बाहेरची प्रलोभने व संपर्क फार नसायचे, त्यामुळे आहे हे आयुष्य बरोबरच आहे अशीच भावना असायची.

नंतर शिक्षणाचे वारे वाहू लागले. पण मुलींना फार शिकू दिले तर त्या डोक्यावर मिरे वाटतील व इतक्या शिकलेल्या मुलीला नवरा  कसा मिळणार? या धास्तीने सातवी फायनल किंवा फार फार तर नॉनमॅट्रिक इतके शिकू देऊन तिचे दोनाचे चार हात व्हायचे.

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही यानुसार मुलींना शिक्षण देण्याचा पालकांचा कल वाढू लागला. आचार विचार, मते, बाहेरच्या जगाचे ज्ञान यामुळे लग्न याबाबतीत खूप सारे संदर्भ बदलू लागले. लहानवयात लग्न होणारी मुलगी आता किमान पदवीधर होऊ लागली. पण हळूहळू  मुलींचे  उच्च शिक्षण  सुरू झाले मात्र आर्थिक स्थैर आल्यामुळे स्वतःच्या मतांचा विचार व आदर होऊ लागला व इगो नावाचा एक फॅमिली मेंबर घरात घुसला. न् घरातील वातावरण बदलू लागले. 

कित्येक घरात खूपजणी सामोपचाराने, तडजोड करत संसार टिकवू पाहतात. पण त्यांना स्वतःला, त्यांच्या मतांना लग्नाला कितीही वर्षं होवो काहीही किंमत नाही यामुळे दुखावतात. कधीतरी वाटते, सगळे सोडून निघून जावे! पण मग विचार येतो कुठे? आपले स्वतःचे, हक्काचे घर तरी आहे का? आणि  शेवटी लोक काय म्हणतील? हा ऐरणीवरचा प्रश्न असतो. पण ज्याला भोगावे लागते त्यालाच माहीत असते ते दुःख, ती सल. कित्येक अतिश्रीमंत, उच्च घरात लग्न झालेल्या मुलीला  पाहुणी असेच वागवतात. या, दोन चार दिवस रहा व परत आपल्या घरी जा. लग्न झाले की तिचा जणू आधारासाठी माहेरवर शून्य हक्क उरतो. अशाच  तिला समजून न घेण्याचा वागण्यामुळे कित्येक हुंडाबळी व  आत्महत्येच्या बळी. तिला गरजेला आपले वाटावे असे एकही घर नव्हते. कारण मग तेव्हा  खानदान  की इज्जत, माहेरून डोली व सासरहून  अर्थी म्हणूनच   बाहेर पडणे. यामुळेच हकनाक बळी गेले. जेव्हा ती नवर्‍याच्या घरी असते तेव्हा तिला माहेरी मानाने  वागविले जाते. पण नवर्‍याने टाकलेली, सोडलेली अशा मुलीला माहेरी अतिशय हीन वागणूक मिळते ही भारतीय समाजाची सर्वच स्तरांवरची शोकांतिका आहे व आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीचे खरे रूप आहे.

पण मुलीला तिच्या संकटात  जेव्हा खरी आधाराची आसर्‍याची गरज असते तेव्हा  प्रत्येक आई-वडिलांनी तिला ठाम आधार देणे गरजेचे असते. अशा आणीबाणीत ती आपल्या हक्काच्या, मायेच्या माणसांकडून मदतीची अपेक्षा नाही करणार तर कोणाकडून?  ज्या घरात तिचे कोवळे पहिले पाऊल  घरातून पुढे जाण्यासाठी पडले, त्या घरात तिचा परतीच्या  पावलाला अडसर  तरी नसावा.

फक्‍तकधीकधी मात्र आपल्या अति लाडावलेल्या मुलीचा संसारात कारण नसताना नको इतकी लुडबुड पण तिचा संसाराचा बोजवारा वाजण्यासाठी कारणीभूत ठरते. कित्येकदा तिची मध्य काढायची, ऍडजस्ट करायची तयारी नसते तेव्हा खरेतर आई-वडिलांनी तिची कानउघाडणी करणे तितकेच महत्त्वाचे असते. पण काही ठिकाणी तू चुकीची असूनपण कशी बरोबर आहेस या आईच्या अति लाडापायी कित्येक संसार उद्ध्वस्त होतात.

घरावर स्वतःचे नाव असो किंवा स्वतःचा एकटीच्या नावावर फ्लॅट असो. त्यात आनंद व सुख किती हे महत्त्वाचे असते. एखादी कोणी भाड्याचा घराला वा झोपडीलासुद्धा स्वर्ग बनविते, तर कोणी महिलाश्रमात राहूनपण उंच भरारी मारू शकते. किती ताणारयचे, कुठे सोडायचे, कुठे धरायचे याचे तारतम्य सर्वांनाच असेल तर घर कायम सगळ्यांना आनंददायी वेलकमच करणार हे मात्र 100% खरे.
घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती
तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती