स्त्री जन्मा ही...हक्‍काचे माहेर

Published On: Sep 12 2019 1:58AM | Last Updated: Sep 11 2019 7:40PM
Responsive image

मानसी सत्तीकर
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट


जास्तीत जास्त स्त्रियांना आपल्या माहेरचे आकर्षण असते, असं दिसून येते आणि माहेरच्या अती आकर्षणामुळे पती-पत्नीमध्ये वरचेवर वादही होत असतात. खरे पाहता फक्‍त पत्नीला नव्हे, तर पतीलादेखील त्याच्या माहेरचे आकर्षण खूप असतं. पण ह्यावर कधी चर्चाच होत नाही. कारण तो लग्नानंतर स्वतःच्या लोकांना सोडून येत नाही. उलट, लग्न झाल्यावर नातेवाईकांमध्ये सणावाराला, वाढदिवस, लग्‍न अशा प्रसंगांना आवर्जून जाऊ लागतो, नाही का! आणि याच्या अगदी नेमकं उलट, लग्न झाल्यावर स्त्रीसोबत घडताना दिसतं. लग्‍नाआधी प्रत्येक कार्य, प्रसंगात पुढाकार घेऊन जाणारी ती लग्नानंतर मात्र माहेरच्या कार्यक्रमांना प्रत्येक वेळेस जाणं जमेलच असं ती स्वतः खात्रीने सांगू शकत नाही.

त्यामुळे स्त्री लग्न करून परत घरी आल्यावर तिला तिच्या माहेरचं आकर्षण कसं काय कमी होऊ शकणार? ती बालपणापासून ज्यांच्यासोबत लहानाची मोठी झाली तेव्हाच्या आठवणी, ती मंडळी, सगळं सासरी आल्यावर लांब गेल्याची भावना येणे स्वाभाविकच आहे.

दैनंदिन जीवनात लग्नाआधी जे सगळं आपल्याजवळ असतं तेव्हा त्याचं तेवढं महत्त्व वाटत नाही. जेव्हा ते नसताना महत्त्व वाटत असते. आणि म्हणूनच जे जवळ नाही त्याचं आकर्षण वाटणं साहजिकच आहे. माहेर हे हक्काचे असते. सासरही हक्काचंच.लग्न होईपर्यंतचा आयुष्यातला जास्त काळ हा माहेरी गेलेला असतो. माहेरचं आकर्षण हे लग्न झाल्यावर सुरुवातीच्या काही काळात जास्त दिसून येते. कुठेतरी लग्नानंतर स्त्रीवर पडणार्‍या जबाबदार्‍या लग्नाआधी नव्हत्या. सगळ्यांना सांभाळून घेत असताना माहेरची आठवण येणे, यात गैर ते काय? एकदा का मुलं-बाळं झाली; त्यांचे शिक्षण, खेळ  क्लास, अभ्यास, स्वतः ची नोकरी, सणवार, हे सगळं सांभाळत असताना त्या स्त्रीची होणारी दमछाक, दिवस सुरू होऊन गडबडीत कधी संपतो हे तिचे तिलाही कळत नसते. तेव्हा अशा वेळी माहेरची ओढ-इच्छा असूनदेखील बराच काळ त्यांना जाऊन भेटणे तर लांबच, पण बरेचदा फोनवरही त्यांच्याशी वरचेवर संवाद साधता येत नाही.

त्यामुळे लग्नानंतर सुरुवातीची काही वर्षे माहेरची ओढ ही जास्त प्रमाणात  असते. खरं तर तिला माहेरची ओढ नेहमीच असते. पण व्यस्त जीवनशैलीत ती कुठेतरी हळूहळू कमी होते. हे सासर-माहेरच्यांनी समजून घ्यायला हवं. स्वतःचा संसार सुखी असण्यासाठी प्रत्येक स्त्रीला माहेरचं कितीही आकर्षण असलं तरीदेखील सासरचंही तेवढंच आकर्षण असायला हवं.