‘आरे’ला ‘का’रे... 

Last Updated: Oct 09 2019 9:11PM
Responsive image


स्नेहल अवचट

काणी एके काळी आपला भारत देश हा  सुजलाम् सुफलाम् असा होता. निसर्ग सौंदर्याने बहरलेला. जणू ‘हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणाच्या मखमालीचे!’ हरित वसुंधरा... शेतीप्रधान देश... पण नवीन शोध, प्रयोग यामुळे शहरे वसू लागली  व नोकरदार वाढीला लागले. त्यामुळे शेती करणारे, गावाकडची संख्या कमी होऊन तो ओघ शहराकडे येऊ लागला. परिणामी शहरात सिमेंटची जंगले वाढू लागली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊन पर्यावरण मात्र धोक्यात येऊ लागले. शेती पिकवणारे थोडे व  खाणारे जास्त अशी असमानता वाढू लागली व अन्न, दूध, फळे, भाजीपाला यांचे दर वाढू लागले. पर्यायाने शहरी जीवन महाग होऊन गेले. आर्थिक, मानसिक, शारीरिक या सर्वच बाबतीत. त्यात रोजची धावपळ, त्रास, मनस्ताप, निसर्गाची अवकृपा यामुळे शहरी जीवन अस्थिर होऊन गेले.  
 

त्या स्थितीत सुधार, बदल मनाला वा डोळ्याला ओलावा देणारा मिळावा. पर्यावरण सांभाळावे, अन्नसाखळी जपावी व सुजाण नागरिक व्हावे यासाठी  घरात, आजूबाजूला, बिल्डिंगच्या सभोवताली लोक कुंड्या,  मातीत, जमिनीत फळे, फुले, पाने लावून पर्यावरणाचा समतोल साधू लागले आहेत. पण अतिक्रमण इतके जास्त  की सगळीकडेच असमतोल चालू आहे. त्यात भरीत भर  म्हणजे नवीन सेवा सुविधांसाठी, नव्या प्रकल्पांसाठी निसर्गावर गदा येऊ लागली आहे. आताचा ज्वलंत विषय म्हणजे आपला ‘आरे’ प्रकल्प होय. मुंबईवर खरे तर कायमची निसर्गाची अवकृपा, संकटे याची टांगती तलवार असतेच. निम्मे आयुष्य हे प्रवासातच जाते. वाढत्या प्रदूषणामुळे आयुष्याची गुणवत्ता तशीही खालावलेलीच आहे. त्यात भरीत भर म्हणजे ही वृक्षतोड होय.  देशातील पुढच्या पिढीचे भवितव्य सगळीकडेच  एकंदरीत धोक्यात व टांगणीला लागले आहे, हेच खरे.
   

या ‘आरे’ कॉलनीत खरे तर कित्येक जीव असलेले म्हणजे माणूस, प्राणी, पक्षी व नसलेले म्हणजे दगड, माती यांची देवाणघेवाण असलेला जंगलाचा नियम प्रवाहित आहे. 34 प्रकारची जंगली फुले, यात राज्यफूल ताम्हण, 13 उभयचर प्राणी, 46 सरपटणारे प्राणी, 16 सस्तन प्राणी, 77 पक्ष्यांच्या प्रजाती. यात राज्यपक्षी हरियाल  व राज्य फुलपाखरू ब्लू मौर मौन, बिबळ्याची मादी व तिचा परिवार स्थानिक आहेत. तरी ते जंगल नाही असे म्हणून याची याचिका रद्द करून वृक्षतोड करणे अतिशय चुकीचा निर्णय आहे. 

  विकासकामे, इमारत बांधणी यात  झाड तोड होणे आपल्या सरावाचे झाले आहे. त्या बदल्यात कुठे व किती झाडे लावली? किती जगली? किती वाढली? त्यांचे पुढे काय? यात पारदर्शी हिशोब नसतोच. इकडे   झाडे लावा, झाडे जगवा ही मोहीम राबवायची  व इकडे एका रात्रीत झाडे व त्यावरील जीवन उद्ध्वस्त करून टाकणे, हा अन्याय आहे. जीव तोडून काम करणार्‍यांना ‘आरे’ला ‘का’रे व्हायलाच पाहिजे.  हरित, हिरवाई ही माणसाला जणू चैतन्य, उत्साह देत असते. 

दारात बहर आलेले फूल, पाने जणू चित्तवृत्ती  बहरात आणतात. कित्येक पक्षी आपली सकाळ सुरेल करून टाकतात.वय काहीही असो, मनाचा तजेला, बहर आपल्याला कायम चिरतरुण ठेवतो ते केवळ या हिरवाईमुळेच. वाढत्या प्रदूषणात, रोगराईत तो एकच जणू आधार वाटतो. सकाळ, संध्याकाळ बागा, उद्याने, टेकड्या आपल्या हरित सौंदर्याने व तनामनाचा सकारात्मक ऊर्जेसाठी खुल्या मनाने आपले स्वागत करण्यास सज्ज असतात तेसुद्धा अगदी फुकट. प्राणी-पक्षी, भारतीय संस्कृतीतील आयुर्वेदिक औषधी झाडेझुडपे यांचा व्याधींवर रामबाण इलाज यांचा अभ्यास जगात कौतुकाचा विषय आहे.  निसर्गाच्या ज्या गोष्टी विनासायास मिळतात त्याची कुठेतरी, कोणाकडून मानहानी ही होतेच. दुष्काळी भागात स्वत:ला प्रसिद्धी देत आपली नेतेमंडळी वृक्षारोपण केल्याचे  प्रदर्शन करत असतात. पण काहीवेळा बहरात आलेली हिरवळ मात्र एका रात्रीत नाहीशी करून टाकतात. 
     

कोण्त्याही चांगल्या कामाला विरोध हा असतोच. हे युगानुयुगे चालूच आहे. पण कोणीतरी एखादा द्रष्टा विरोधाची तमा विचारात  न घेता आपले काम मनापासून करत असतो. यात आपले आसामचे   जादव पायंगे यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल.कोणाची मदत नसताना, आर्थिक पाठबळ नसताना स्वतःच्या हिमतीवर 1400 एकर जमिनीत वयाच्या  सोळाव्या वर्षापासून रोज एक एक झाड लावणे खरोखर अशक्य आहे. प्रसंगी स्थानिक लोकांनी 100/150 आलेल्या हत्तींमुळे त्यांचे जीवन धोक्यात आले. यामुळे त्यांना बेदम मारहाण केली, तर रागाने त्यांचे जंगल पेटवून दिले.  तरीही हे आपले लगे रहो! खरे तर हत्तींचे येणे ही त्यांच्या जंगल निर्मितीच्या कामाला दिलेली उत्स्फूर्त पावती होती. 

खूप वर्षांनी एका चित्रकाराने याची दखल घ्यावी व जवळजवळ तीस वर्षांनी आपल्या सरकारला  त्यांचे काम कळावे, ही खेदजनक बाब  आहे. पण तरीही त्यांना या ‘पद्मश्री’ने ना खेद ना खंत असा काहीही फरक पडला नाही. त्यांचे वनप्रेम  व वसुंधरा सेवा आजतागायत चालूच आहे. 
   

पुण्यात  ‘वेध’ या डॉ. आनंद नाडकर्णी सरांच्या कार्यक्रमात त्यांना भेटण्याचा योग आला होता. पण बडेजावकी, फुशारकी,  ‘मी’पणा याचा कुठेही मागमूस जाणवला नाही. ध्येयप्रेरित लोकांना खरेतर कोण्त्याही मानसन्मानाची गरज नसते हेच खरे. पण असे क्रांतिकारी विचार व आचारांचे लोकच आपले जबाबदार वेगळेपण सिद्ध करतात व स्वतःशी प्रामाणिक राहून आपले काम  पडद्याआड राहून चोख करत राहतात. 
   

देव करो आणि आपल्या सरकारलादेखील वन रक्षणाचे महत्त्व कळू दे व आपले ‘आरे’ जंगल व देशातील सर्व हिरवाई, वने, जंगले नवनवीन प्रयोग करताना आहे ती हरित संपत्ती टिकवून त्यातच काही सुवर्णमध्य काढून ती नष्ट न करता आहे ती अबाधित राहून जागा उरल्यास त्यात वाढ कशी होईल, ही सुबुद्धी मिळो! हीच त्या परमेश्वराला मनापासून प्रार्थना..!!