स्त्री जन्मा ही ... पुरातन काळातील स्त्री

Last Updated: Nov 06 2019 7:59PM
Responsive image

मानसी सत्तीकर
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट


पूर्वीच्या काळात  ‘स्त्री’ची प्रतिमा जर आठवली तरी खूप शांत, समाधानी, सोज्वळ, कमालीची प्रेमळ व आदर्श ठेवणारी अशी म्हणू शकतो. पूर्वीच्या काळी स्त्री ही घरातच असे. चूल व मूल संभाळत. त्याकाळी एकत्र कुटुंबपद्धती असल्याकारणाने चिंता, आनंद, दुःखंही वाटली जायची. आजचा स्वयंपाक रुचकर कसा बनेल, यात आनंदाने रममाण होत असत. पाट्यावर वाटण करणे असूदे, जात्यावर दळण, घर सारवण असेना का, हाच त्यांचा व्यायाम असे. छंद म्हणजे शिवणकाम, भरतकाम   थोडक्यात पण समाधानीवृत्ती असायची. येणारे जाणारे, कोणाची तरी मुले शिकायला तसेच सणवार, आजारपण जपत दिवस अगदी कष्टात जात असे. यामुळे कदाचित आपल्या आईचे कष्ट ओळखून जाणून समजून  त्याकाळची मुलं-मुली आई-वडिलांच्या प्रत्येक शब्दाला प्रचंड मान देत असे. आदरयुक्त भीती ही मुलांना असे.

पूर्वीच्या काळी स्त्रियांची डोके शांत असल्याने विचारही प्रगल्भ असायचे. भलेही शिक्षणाने कमी अथवा अशिक्षित असेना का पण छोट्या-मोठ्या आजारांवर घरच्या घरीच तोडगा काढून आजार बरे करण्याची ताकत, इच्छाशक्ती तिच्यामध्ये असे. पती परमेश्वर अशी भावना असल्याने पतीपुढे-वरिष्ठांपुढे ‘ब्र’देखील काढायची हिंमत नसे, इतका कमालीचा मान दिला जात असे.

पूर्वीची स्त्री ही विधवा झाल्यावर सती जाण्याची प्रथा होती. कालांतराने ही प्रथा बंद होऊन तिचे पती निधनानंतर केशवपन करायचे, जेणेकरून विद्रूप दिसल्याने परपुरुषाची नजर तिच्यावर टिकून राहू नये. मग कालांतराने ही प्रथाही बंद झाली. 

सावित्रीबाई फुले यांसारख्या महिलांमुळे शिक्षण पद्धती स्त्रियांमध्ये सुरू झाली मग काय, स्त्रियांच्या हुशारीला वाव मिळत गेला.  तिच्या कुटुंबाच्या मदतीने व स्वतःचे जबरदस्त इच्छाशक्ती व पतीची सोबत ह्याने पुरातन श्री आधुनिक काळात प्रत्येकच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करीत असताना दिसते.