सलवार-कमीज परिधान करताना...

Published On: Aug 14 2019 11:26PM | Last Updated: Aug 14 2019 11:26PM
Responsive image


प्रांजली देशमुख

सलवार कमीज हा नेहमीचाच पोषाख; पण त्यामुळे तो घालताना बरेचदा विशेष काळजी घेतली जात नाही. त्यामुळे लूक खराब होऊ शकतो. हे टाळण्यासाठी काही टिप्स ः 

पटियाला सलवार आणि लाँग कुर्ता ः पटियाला सलवार आणि जास्त लांबीचा कुर्ता हे चुकीचे समीकरण आहे.  पटियाला सलवारवर गुडघ्यापेक्षा कमी उंचीचे कुर्तेच घालावेत. कारण, पटियाला सलवारला खूप चुण्या असतात आणि तीच त्याची खासियत आहे. लांब कुर्त्याखाली त्या सर्व चुण्या झाकल्या जातात.  

अ‍ॅक्सेसरीजचा अतिरेक ः ब्रोकेड किंवा कलाकुसर केलेला पंजाबी पोशाख असेल, तर त्यावर कमीत कमी दागिने किंवा अ‍ॅक्सेसरीज घालाव्यात. मोठे दागिने किंवा हातभर बांगड्या या गोष्टी चांगल्या दिसत नाहीत.  

अस्तरचा प्रश्‍न ः काही कुर्त्यांना अस्तर लावणे गरजेचेच असते. ड्रेस शिवून घेताना त्याच्याबरोबर मापाचे अस्तर लावून घेता येते; पण तयार ड्रेस घेतला असेल, तर अस्तर वेगळे शिवून घ्यावे. जेणेकरून, ते कुडत्याच्या बाहेर डोकावणार नाही. काही पोषाखांमध्ये स्लीप बाहेर डोकावत असल्याने दोन कुर्ते घातले आहेत, की काय असा भास होतो. त्यामुळे आपल्या पोशाखाचा आकर्षकपणाच कमी होतो. 

गरज असताना ओढणीला फाटा ः काही पोशाखांवर ओढणीची आवश्यकता असते, तर काहींवर ती चांगली दिसत नाही. कुर्त्याचा गळा मोठा खोल, कलाकुसर असलेला असेल तर काही वेळा ओढणी न घेतल्याने अवघडलेपण येते. अशा वेळी खूप वजनदार ओढणी नको असली तरीही साधी शिफॉनची ओढणी घ्यावी.  

रंगसंगती महत्त्वाची ः पोषाख कितीही आकर्षक, कलाकुसर केलेला, चांगल्या कापडाचा असला तरी सर्वांत महत्त्वाची असते ती रंगसंगती. रंगसंगती याचा अर्थ सर्वच एकाच रंगाचे असावे, असे नाही. विविध रंगछटांचा योग्य वापर केलेला पोषाख व्यक्‍तिमत्त्वाला आकर्षक लूक देतो. त्यामुळे रंगसंगती निवडताना चोखंदळपणाने आणि ट्रेंडस् विचारात घेऊन निवडावी.