कुटुंबाचा कणा व पाया

Last Updated: Oct 09 2019 9:06PM
Responsive image


मानसी सत्तीकर

स्त्री हा कुटुंबाचा कणा असतो, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पूर्वीच्या काळातील तिची भूमिका कण्याची होती. आजही आहे आणि उद्याही असणार आहे.कुटुंबाची व्याख्या काळानुसार बदलत गेली. कुटुंब ही संस्थाच मुळी स्त्रियांमुळे झालेली आहे. जगायचं कशाला हे शिकविणार्‍या संस्कृतीचा स्रोतही स्त्रीच आहे.स्त्रीही जन्मदात्री  आहे. निसर्गाच्या नवीन पिढीच्या जडणघडणीची जबाबदारी स्त्रीवरच टाकलेली आहे आणि त्याकरिता तिच्यात विलक्षण शक्‍तीही भरलेली आहे. कुटुंबाच्या रक्षणासाठी प्रसंगी ती जो लढा देते तो पुरुषाला कदापिही देणे शक्य नाही. म्हणून तर पुराणांमध्ये जेव्हा केव्हा देवांवर संकट कोसळले तेव्हा तेव्हा देवांनी कोणत्या ना कोणत्या देवीला साकडे घातलेल्याचा उल्लेख आढळतो.विष्णूलाही भस्मासुराचा वध करण्यासाठी मोहिनी रूप धारण करावे लागले होते.

स्त्री शिवाय कुटुंब अशक्य आणि कुटुंबाशिवाय समाज अशक्य. म्हणून तर स्त्री हा फक्‍त कुटुंबाचाच नव्हे, तर समाजाचा आणि पर्यायाने देशाचा पाया आहे. म्हणून ज्या समाजात स्त्री दुय्यम असते त्या समाजाचे भवितव्य अवघड होत जाते. काही ठिकाणी आजही स्त्रियांना स्त्री म्हणून अनेक बंधनांना तोंड द्यावेच लागते. कुटुंब, समाज आणि देश यांचे अस्तित्व टिकवायचे असेल तर कुटुंब आणि स्त्री यांचे नाते ओळखून त्याप्रमाणे समाजव्यवस्था निर्माण करावी लागेल. स्त्रीमधील प्रचंड ऊर्जेला वाव द्यावा लागेल. नाहीतर ज्वालामुखीसारखी उसळून बाहेर यायला वेळ लागणार नाही. फरक एकच असेल, ज्वालामुखी विध्वंस करतो, तर स्त्री काहीतरी विधायक करेल.

स्त्री ही पुरुषाच्या कर्तृत्वाला आभाळ मोकळं करून देताना दिसते. उगाच नाही ‘प्रत्येक कर्तृत्वान पुरुषाच्या मागे एक स्त्री असते’ असे म्हणतात. आपली पुरुषप्रधान समाजव्यवस्था आता हळूहळू मागे पडताना आढळत असली तरी अजून ती म्हणावी तशी संपलेली नाही. काही कुटुंबांमध्ये मात्र त्या कुटुंबातील स्त्रीतले पोटेन्शियल ओळखून तिला त्या कुटुंबातल्या इतर सदस्यांचा खंबीर पाठिंबा मिळू लागला आहे. हे चित्र अजूनही दुर्मीळ असले तरी आश्वासक आहे. तेव्हा कुटुंब आणि करिअर यातील एक निवडायची वेळ आल्यास स्त्री नेहमीच कुटुंबाला प्राधान्य देताना दिसते.म्हणून स्त्री कुटुंबाचा कणा व पाया असते हे मनापासून मान्य करायला हवे.