Sat, May 30, 2020 00:22होमपेज › Kasturi › मन की बात : प्रकाशाच्या वाटा

मन की बात : प्रकाशाच्या वाटा

Published On: Aug 01 2019 1:22AM | Last Updated: Aug 01 2019 1:22AM
स्नेहल अवचट

राही बाई, विदर्भातील एक शेतकरी कुटुंबातील एक सदस्य, तेथील सगळ्यांना भेडसावणारा प्रश्‍न म्हणजे  दुष्काळ तो त्यांनाही होता... एक झाकायला जावे तर दुसरे उघडे हा जणू जीवनाचा परिपाठ... त्यामुळे कर्जबाजारी आयुष्य... या अटीतटीच्या आयुष्यात त्यांच्या पतीने हे सगळे असह्य होऊन  कुटुंबाला सोडून एका रात्री शेतात गळफास लावून स्वतःचे आयुष्य तर संपवून टाकले... निरक्षर राही बाईंवर जणू आभाळ कोसळले... पदरी तीन मुले आणि  कर्जबाजारी असा थोडा जमिनीचा तुकडा... सगळे आयुष्य जणू  गडद अंधारमय...अशा वेळी राहीबाईंचा हाताला असलेली चव त्यांना उजेडाची तिरीप दाखवून गेली,, यातून बाहेर पडण्याची प्रचंड इच्छाशक्‍ती व अतोनात कष्टाची तयारी यामुळे त्यांनी आपल्या वयात येणार्‍या मुलांना हाताशी धरून, बचत गटाची आर्थिक मदत घेऊन शहरी भागात आपले स्वयंपाक घर सुरू केले... कोणतीही जाहिरात न करता लोकांना हे घर भावून गेले... दोन वर्षांत नवर्‍याने ठेवलेले सर्व कर्ज फेडून, जमीन सोडवून स्वतःची केली ते या दिवसरात्र राबून केलेल्या कष्टावीण फळ ना मिळते या मानसिकतेमुळेच शक्य झाले... व अशा तर्‍हेने  एका परिवारातील अंधकार मिटला..

मानवी जीवन म्हणजे न सुटणारा सुख-दुःखाचा फेरा असतो... सतत आशा आणि निराशेचा पाठशिवणीचा खेळ असतो.. माणसाची उमेद   त्याला यातून बाहेर काढण्यास प्रभावी ठरते. आनंदाची एखादी तिरीपसुद्धा आपल्या दुर्बल मनाला वाट काढण्यासाठी हातभार लावत असते... यासाठी आपले सणवार माणसाला आपले दुःख विसराईला कायम मदतच करतात... श्रावणातील रिमझिम पावसामुळे जमीन आपले रूप बदलून हिरवाईने नटत असते. धरणीचा असाच वरदहस्त लाभो, रोगराई, इडापिडा बाहेर जावो व आयुष्यात प्रकाश निर्माण होवो याच बळावर तर मानवी आयुष्य चालू असते... आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीत दिवा व प्रकाश यांचे जीवनाशी जणू एक सुंदर नाते असते. प्राणाला पण प्राणज्योत  असेच संबोधले जाते. आयुष्यात कितीही अंधार दाटून आला तरी देखील कुठेतरी प्रकाशाचा कवडसा, चाहूल ही असतेच फक्‍त त्यासाठी तुमची जबर इचछाशक्‍ती, कष्टाची तयारी, स्व:तावरचा विश्‍वास व श्रद्धा मात्र 100 टक्के हवी. 

जीवनात लाख वादळे येऊन जीव अगदी नकोसा होऊन काळोख दाटलेला असतो, संकटे एकमेकांना हाहाकार देत संपत नसतात, पण तरी देखील अंधारल्या वाटेवर प्रकाशाची चमक असतेच... फक्‍त अशा वेळी डगमगून न जाता शांतपणे, विचारपूर्वक आलेली एखादी तिरीप पुढची वाट सुसह्य करून जातेच... अडचणींचा पाढा वाचत बसण्यापेक्षा घायकुतीला न येता त्यावर विचारपूर्वक काढलेला तोडगा जास्त सकारात्मक असतो...

धीरूभाई अंबानी यांनी असेच अनंत अडथळे पार करून आयुष्यात प्रकाश पसरविला होता.. सुधा चंद्रन यांनी अपघात झाल्यावर आपला पाय गमावला. या अपंगत्वावर मात करून अतोनात कष्ट व जिद्दीने परत आपल्या पायात बळ आणून नृत्यातून आपला प्रवास उजळून टाकला...  सर्व आमटे कुटुंबाला पण माहीत नव्हते की आपल्या या सेवेचा परिणाम काय होणार? कोणतीही मदत नसताना झोकून काहीतरी करण्याचा मानस त्यांना प्रकाशाच्या वाटा मात्र दाखवून गेला.. तोच अनुभव  व्यसनी माणसांचा आयुष्यात भविष्यातील अंधार दूर करण्याचे काम अवचट परिवाराचे मुक्‍तांगण व अशा अनेक संस्था करत आहेत.  जीवघेणे आजार, अपघातामुळे आलेले शारीरिक अपंगत्व, मानसिक आजार यामुळे आयुष्य झाकोळून गेलेले असते, अशा वेळी सपोर्ट ग्रुप  व त्यासाठी काम करणार्‍या संस्था व आपली माणसे यांच्यामुळे आयुष्यात नक्‍कीच आशेचे किरण येतात हे मात्र खरे.

आपली सध्या अतिशय चर्चेत असलेली सुवर्ण कन्या म्हणजे आपली छोटी हिमा दास हिने अतिशय प्रतिकूल  अंधार्‍या परिस्थितीवर मात करून आपले देदीप्यमान यश मिळवले आहे. बुस्ट आणि बौर्नव्हिट। घेतला कीच सर्व खेळात प्रावीण्य मिळते हा समज या डाळभात खाणार्‍या मुलीने हाणून पाडला. घरातून कोणतीही अनुकूल परिस्थिती नसताना केवळ स्वतःचा दुर्दम्य इच्छाशक्‍ती वर या मुलीने स्वतःचे आयुष्य व सर्व भारतीयांना पण अगदी लख लख चंदेरी सोनेरी न्यार्‍या दुनियेत नेऊन ठेवले. आपल्या सावित्रीबाई फुले, कर्वे, रानडे या दाम्पत्यांनी स्त्रियांचा आयुष्यात शिक्षणाचा वाटा दाखवून जणू त्यांचे आयुष्य तिमिरातून तेजाकडे नेऊन मनीचा भाव मात्र

फिटे अंधाराचे जाळे, 
झाले मोकळे आकाश
दरीखोर्‍यातून वाहे 
एक प्रकाश प्रकाश
असा रुपेरी करून टाकला यात शंका नाही...