बालमानस : मुलांची एकाग्रता 

Last Updated: Mar 18 2020 7:46PM
Responsive image

मानसी सत्तीकर
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट


हुशारीच्या जोडीला एकाग्रता असणे गरजेचे असते. एकाग्रता सहजासहजी प्राप्त होत नसते. मुलांच्या अंगी एकाग्रता येण्यासाठी पालकांना परिश्रम करावे लागतात. अगदी मुलं चावीची खेळणी खेळत असतात तेव्हापासून त्यांची काळजी घेताना, त्यांची एकाग्रता विकसित करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आपण मुलांसाठी भरपूर खेळणी आणतो, त्यांची हौस पुरवितो. मात्र हे लाड करीत असताना त्याच्या परिणामांचा विचार मात्र पालक म्हणून आपण करीत नाही.

आपण लहानपणी मुलांना निरनिराळी खेळणी आणतो. थोडावेळ गाडीशी खेळले की लगेच मूल चेंडूकडे धावते. दुसर्‍या मुलांच्या हातात दुसरं खेळणं दिसलं की याला ते खेळणं हवंहवंसं वाटतं. जर ते खेळणं नाही मिळालं तर ते मूल रडणे, हात-पाय आपटणे याद्वारे आपला राग प्रकट करते. जर त्या मुलाचे वय मोठे असेल आणि समोरच्या मुलाचे वय लहान असेल, तर त्या मुलाच्या हातातून ते खेळणे हिसकावून घेणे, त्याला मारणे अशा क्रियाही याच्या हातून घडू शकतात. नेमकी हीच वेळ असते सुधारण्याची.

मुलांना एकदम अनेक खेळणी समोर टाकून खेळण्यास सांगू नये. त्यांचे मन एकाच खेळावर केंद्रित होऊ द्या .त्याचे मन एकाग्र होण्यासाठी त्याला तशा प्रकारची खेळणी आणून द्या. साधारण नऊ-दहा वर्षांचे वय होईपर्यंत एका जागेवर बसून खेळणे. ठरावीक काळापर्यंत बसून अभ्यास करणे. याची सवय लावणे आवश्यक आहे .यालाच काही जण बैठक पक्की होणं असं म्हणतात. यासाठी प्रसंगी पालकांनाही तेव्हा वेळ काढून मुलांच्या शेजारी  बसावे लागते.  पालकांची ही मुलाबरोबरची बैठकच मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया पक्का करणारी असते.

अनेकदा वारंवार खेळणी बदलणे, अनेक खेळणी एकदम समोर ठेवणे, हे प्रकार पालकच करतात. त्यामुळे  मुलांचे मन एकाग्र होऊ शकत नाही. एकाग्रतेसाठी ओंकाराचीही सवय लावता आली तर उत्तम. अलीकडे हातामध्ये रिमोट घेऊन क्षणोक्षणी वेगवेगळे चॅनल्स बदलण्याची वृत्ती पालकांमध्ये दिसून येते. अशा वेळी त्यांच्या मुलांकडून एकाग्रतेची अपेक्षा कशी ठेवता येणार?