मुलांना शिकवा कलाकुसर

Last Updated: Nov 06 2019 8:03PM
Responsive image
संग्रहित फोटो

मृणाल सावंत


दीर्घकालीन सुट्या या मुलांना कंटाळवाण्या होऊ शकतात. पालकांसाठीही मुलांना सतत व्यस्त ठेवणे म्हणजे मोठे आव्हानच असते. कारण त्यांना मुळातच रिकामे बसणे आवडत नाही. या मुलांना व्यस्त ठेवायचे असेल तर त्यांच्याकडून काही नावीन्यपूर्ण कामे करवून घ्यावीत. कारण यामुळे त्यांना उत्साह वाटेल आणि नवीन काही केल्याचा आनंदही मिळेल. अशाच काही वस्तू कशा प्रकारे बनवायच्या हे जाणून घेऊ. 

ज्युस पॅकपासून पर्स : रेडिमेड ज्युस पॅकेटपासून आपण मुलांसाठी आगळी वेगळी पर्स बनवू शकतो. मुलांनाही ती बनवता येऊ शकेल. त्यासाठी ज्युस पॅकेट अतिशय काळजीपूर्वक उघडावे आणि ते चांगल्या प्रकारे धुऊन घ्यावे. या ज्युस पॅकेटवर पर्सचा आकार पेन्सिलीने ड्रॉ करून घ्यावा. कात्रीने तो आकार कापून घ्यावा आणि त्यानुसार हे पॅकेट दुमडावे. ज्युस पॅकचे झाकण पर्सच्या बटणाचे काम करू शकेल. अशा प्रकारे ज्युस पॅकपासून पर्स बनवता येईल. 

क्लॉथ पिनचे ग्लायडर : यासाठी लाकडी क्लॉथ पिन, दोन आईस्क्रीम स्टिक्स, एक छोटी स्टिक आपल्या आवडीच्या रंगाने रंगवून घ्यावी. आईस्क्रीमच्या स्टिकला क्लॉथ पिनच्या वर पुढच्या बाजूने वरच्या आणि खालच्या बाजूने चिकटवावे. या स्टिक म्हणजे ग्लायडरचे पंख दिसतील. मागच्या बाजूला छोटी स्टिक लावावी. पिनच्या खालच्या बाजूला छोटेसे चुंबक लावावे आणि हे ग्लायडर फ्रिजवर चिकटवावे. 

पेपर रोल फुलपाखरू : यासाठी रिकामा टॉयलेट पेपर रोल घ्यावा. याच्या चारही बाजूने रंगीत ठिपक्यांचा कागद चिकटवावा. क्राफ्टच्या दुकानातून दोन डोळे आणून त्यावर चिकटवावेत. रंगीत रिबीनीपासून पुढच्या बाजूला छोटीशी गाठ बांधून फुलपाखराचे अ‍ॅन्टीना बनवावेत आणि ते रोलच्या आतल्या बाजूने चिकटवावेत. यानंतर क्राफ्ट पेपरवर फुलपाखराचे पंख बनवावेत. त्यावर आपल्याला आवडेल असा कागद चिकटवावा आणि डिझाईन बनवावे. हे पंख व्यवस्थित पद्धतीने पेपर रोलला चिकटवेत आणि सुंदरसे फुलपाखरू तयार करावे. 

रंगीबेरंगी पेन्सिल : मुलांना रंगीबेरंगी पेन्सिलने लिहिणे खूप आवडते. त्यांची साधी पेन्सिलदेखील सहजपणे रंगीबेरंगी बनवता येऊ शकते. पेन्सिलीवर आपल्याला पाहिजे तशा प्रकारे आडवे, तिरके, सरळ अशा प्रकारे पातळ टेप चिकटवावी. संपूर्ण पेन्सिल आता आवडत्या अ‍ॅक्रेलिक रंगाने पेन्ट करावी. कोरडे झाल्यानंतर चिकटवलेल्या टेप काढून टाकाव्यात. रंगीबेरंगी पेन्सिल तयार झालेली दिसेल. अशा प्रकारे मुलांना वेगवेगळ्या वस्तू शिकवून आपण त्यांना आनंदी ठेवू शकतो.