श्रावण पावन

Published On: Aug 14 2019 11:26PM | Last Updated: Aug 14 2019 11:26PM
Responsive image


सुरेखा मालवणकर

हिरवळीने सजलेली, जणू हिरवा शालू नेसलेली धरती, अधून मधून इंद्रधनुष्याचे रमणीय दर्शन, रिमझिम पाऊस, विविध फुलांचा सुगंधी बहर, मातीचा सुगंध ही तर श्रावणाची ओळख! यामुळे प्रत्येकाचे मन हर्षते. त्याचबरोबर श्रावण महिना सुरू झाला, की आठवतात त्या बालकवींच्या कवितेच्या ओळी ‘श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सर सर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे’. श्रावणातील हिरवा, पोपटी निसर्ग पावसाने खुलून येतो. तो पाहून आपले मन प्रफुल्लीत होते. मानवातील शुद्ध, सुप्त गुण खुलून यावे, जागृत व्हावे म्हणूनच या महिन्यापासून सण, व्रत-वैकल्ल्यास सुरुवात होते .

श्रावण हा सर्वात पवित्र महिना मानला  जातो.श्रावणातील प्रत्येक दिवस काही ना काही धार्मिक, सात्विक परंपरा घेऊन उगवतो. श्रावणात भगवान श्रीकृष्ण यांनी जन्म घेतला. हा भगवंताचा आठवा अवतार.कृष्ण पक्षातील अष्टमीस भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. कृष्ण देव हा पूर्ण पुरुषोत्तम आहे. तो आपल्या संस्कृतीचे रम्य आनंद विधान आहे. 

भक्‍तिमय मनोहर हिरवा निसर्ग सुरू जाहला श्रावण मास पर्व 

दुग्ध शर्करा अभिषेक, बेल पत्र
शिव शंकरा अर्पूया शिवामूठ सर्व      

श्रावणाचा महिना हा भगवान शंकरालाही समर्पित आहे. भगवान शंकराचा आवडता महिना आहे. शिवभक्तीचे प्रतीक आहे; पण त्याच बरोबर शंकराची पत्नी पार्वती हिमगौरी हिचेही फार महत्त्व आहे शंकराची भक्ती ही पार्वती म्हणजेच गौरी पूजनाशिवाय अधुरी आहे. याच महिन्यापासून सण-उत्सवाला सुरुवात होते आणि सण म्हटले की नववधूसाठी नवा उत्साह, सुवासिनींना नटण्याची, सुखाची पर्वणीच जणू! निसर्गाने भरभरून दिलेले हिरवेपण, सुख-समृद्धी लुटण्याचे दिवस. असाच श्रावणातला एक उत्सव म्हणजे मंगळागौर! पार्वतीसारखे अखंड सौभाग्य लाभावे म्हणून सुवासिनी मंगळागौर पूजन व्रत करतात. कुमारिका चांगला शंकरासारखा वर मिळावा म्हणून ते करतात. शिव-पार्वतीबरोबर गणपती, विष्णू, सूर्य यांचीही पूजा केली जाते. श्रावणातल्या दर मंगळवारी गौर सजवली जाते. नववधूने पहिली 5 वर्षे हे व्रत करण्याची प्रथा आहे.सुवासिनी आणि कुमारिका उपवास करतात. गौरीला सुग्रास नैवेद्य ठेवतात. नैवेद्यात मटकीची उसळ, भाजणीचे वडे, पुरण पोळी हे पदार्थ खास असतात. जागरण करून सार्‍याजणी मंगळागौरीचे खेळ खेळतात. हे खेळ पूर्वीपासून खेळले जातात. याला वयाचे बंधन नसते. पूर्वी स्त्रिया नोकरी करीत नसत. जास्तीत जास्त वेळ त्यांचा स्वयंपाक घरात जात असे, मग हे खेळ स्वयंपाक घरातील वस्तू वापरून खेळले जात

. जसे सूप, लाटणे, वाट्या, ताट. खेळताना केशिनी फुगडी, जातं फुगडी, कर्णावती नाच, दिंडा, बेटका, पिंगा हे खेळ खेळले जात. शिवाय, आपसात गप्पा-गोष्टी, उखाणे एकमेकींना घेण्यास सांगणे हेही आवडीने खेळाच्या अधेमधे होते. या खेळांचा उपयोग सर्वांनी व्यायामाच्या द‍ृष्टिकोनातून केला पाहिजे. श्रावण महिन्याची आख्यायिका-कथा अशी आहे आख्यायिका :- मंगळागौरीचे स्थान हे  काशीच्या पंचघाटीत सर्वोच्च स्थानावर आहे . तिला काशीचे कैलाशही म्हणतात. मानले जाते की मंगळागौरीच्या पूजनाने मंगळाचा दोषही नाहीसा होतो.

देवी भागवतात मंगळागौरीच्या या रूपास देवी मंगल चंडिका असे म्हणतात. येथे पंच देवाच्या म्हणजे शिव, पार्वती, गणपती, विष्णू, सूर्य यांच्या प्राचीन मूर्ती आहेत. हेच भक्तांचे खास आकर्षण आहे. असे मानले जाते, की पंच देवतांच्या दर्शनानेच मुक्ती मिळते. पापमुक्ती होते. गंगा घाटावर नागर शैलीत स्वतः भगवान सूर्यदेवाने मंगळागौरीची स्थापना केली.
    सखींनो, मग चला तर सौभाग्य आनंद सण साजरे करून, करूया मंगळागौर पूजन!