मन की बात : बाल (हक्‍क) हट्ट

Last Updated: Nov 14 2019 1:57AM
Responsive image

स्नेहल अवचट


बालपण किती सुख विलासात गेले..
खेळता बागडता क्षणात दिस गेले..
मस्ती मौज करता तरुणपण मात्र आले...

लहानपणच्या आठवणी म्हणजे आयुष्याचे एक सुखद पिंपळ पान असते... जसे दिवस जातील तशी तशी आठवणींची जाळी जास्तच पसरत असते.. स्वतः भोवती फिरणारे एक छोटेसे जग.. लोक काय म्हणतील? हा विचार कधी डोक्यातच येत नसे... आपल्याच धुंदीत जणू रममाण.. पण तेव्हा वाटायचे की कधी एकदा मोठे होऊ...!! आणि आता वाटते की वेळेचे घड्याळ पुन्हा एकदा भूतकाळात जाऊन तेच सोनेरी दिवस पुन्हा आणले तर?

तर असे हे रम्य बालपण आठवण्याचे कारण म्हणजे आज आपला बालदिन..मुले म्हणजे देवा घरची फुलेच असतात.. त्यांना जपणे.. त्यांना योग्य संस्कार देणे... सुरक्षित, उबदार वातावरणात त्यांना वाढविणे हे प्रत्येक पालकांचे आद्य कर्तव्यच असते.. कारण आजचा बालक हा उद्याचा सुजाण, भावी नागरिक असतो.. त्याचा योग्य विकास व उत्तम संस्कार लाभले तरच उद्याची पिढी ही आचार विचाराने चांगली होणार असते!!!!

पण प्रत्येक ठिकाणीच मुलांना गरजेची पण चांगली वागणूक मिळतेच असे नाही..पहिल्या महायुद्धात जगभरात अनेक देशांची वाताहात झाली.. मुले पोरकी व अनाथ झाली.. व कित्येक त्रासांना सामोरी झाली. त्यामुळे 1920 पासून मुलांच्या हक्‍कांसाठी प्रयत्न सुरू झाले होते..1924 साली एका ब्रिटीश महिलेने यासाठी एक पाच कलमी पत्रक मांडले, जे मंजूर पण झाले होते..संयुक्‍त राष्ट्र संघाने मंजूर केलेले हे हक्‍क 20 डिसेंबर 1992 रोजी भारत सरकारने हे बाल हक्‍क मान्य केले ही आनंदाची बाब होती.. पण ते स्वीकारण्याची मानसिकता फारशी नव्हती.. मुलांचे कसले अधिकार?? आम्ही नाही का त्याशिवाय मोठे झालो?? त्यांना काय कळते आहे?? आणि त्यांना काय विचारायचे?? पालक म्हणतील तेच खरे..!! हीच एक विचारधारा होती...अजूनही कित्येक ठिकाणी, कोणत्याही स्तरात व कित्येक देशांत पालकांचे वर्चस्व हे दिसून येतेच...,!!!

जगण्याचा अधिकार हा किडा, मुंगीपासून सर्व सजीव सृष्टीला असतोच.. पण माणूस नावाचा एक मोठा प्राणी कोणत्याही अधिकारांची आपल्या सोयीसाठी पायमल्ली करतच असतो... प्रत्येक बालकाला उत्तम आरोग्य व पोषक आहार मिळून त्याला जगण्याची मुभा आहे.. हा एक कागदावरचा अधिकार आहे... पण कित्येक कळ्या या गर्भातच जीवे मारल्या जातात.. तर कधी विकून टाकणारे आई-वडीलच असतात..तर आपलाच पोटचा गोळा कचर्‍यात फेकणारे पण हेच नराधम सर्व कायदे धाब्यावर बसवून राजरोस हिंडत असतात.. बेटी बचाओ, बेटी पढाओ यासाठी कायदे, जाहिराती व गाजावाजा असतो, पण तरीही आई-वडील व कित्येक डॉक्टर वंशाच्या दिव्यासाठी हे नीच कृत्य करतच आहेत.. असे होऊ नये पण, बेटा बचाओ अशी एक ही जाहिरात आजपर्यंत कुठेही बघितलेली नाही ही मन सुन्‍न करणारी गोष्ट आहे...कित्येक ठिकाणी मुलांची भुकेची भ्रांत असते, तर कुठे नको इतके ठासले जाते...हा पण एक विरोधाभासच आहे..

शिक्षण, कला, खेळ, मनोरंजन हे विकासाच्या द‍ृष्टीने मुलांसाठी खूप महत्त्वाचे आहेत.. शहरी भागात आर्थिक स्तर बरा असेल तर मुले शाळेत जातात.. सर्व  सोई सुविधा मिळून कोणी मनापासून प्रगती करतात, तर कोणी मन मारून रट्टा तर कधी न झेपून गटांगळ्या खात हात पाय मारत असतात. अंगणवाडी व प्राथमिक शिक्षण तिथे मिळणार्‍या जेवणाच्या आशेने तरी होऊन जाते. पण कित्येक ठिकाणी बुद्धी असून पण हातातोंडाची गाठ असते, त्यामुळे मजूर होऊन घरात मदत करावी लागते  तर कधी मुलगी म्हणून लहान भावंडांची जबाबदारी  तर कधी वयात येणार्‍या मुलीला बाहेर पाठवायला नको म्हणून कोणत्यातरी कसायाच्या गळ्यात बांधून टाकले जाते व शिक्षणाला राम राम ठोकला जातो.

संरक्षण यासाठी कित्येक मुले आपल्या घरातच वंचित असतात ही अतिशय दुःखद बाब आहे.. विविध कारणांसाठी होणारी पिळवणूक, छळ, दुर्लक्ष यामुळे मुले सैरभैर होतात.. आपल्याच लोकांच्या विरोधात जायचे कुठे?? हा प्रश्‍नच डोक्यात येत नाही, त्यामुळे सहन करणे हा एकच पर्याय समोर असतो. शिवीगाळ, बेदम मारहाण, अमानुष अपमानित वागणूक.. कित्येकदा घरात वडील, भाऊ यांच्याकडून लैगिक शोषण, धोक्याच्या ठिकाणी कामाला लावून, भिकेला लावून  ते पैसे वापरणारे क्रूर पालक...अशा कित्येक अतर्क्य गोष्टींना या लहानग्या जीवाला सामोरे जावे लागते..1098 ही मुलांसाठी काम करणारी हेल्पलाईन  मुलांसाठी कार्यरत आहे, पण परदेशात मुले तेथील मदत यंत्रणेमुळे जशी आई-वडिलांना धमकी देऊन पोलिसांना बोलावू शकतात तशी आपल्या मुलांची  मानसिकता अजून बदलणे गरजेचे आहे... काही. आश्रम शाळा, अनाथालये, बालसुधार गृहे याठिकाणी रक्षकच भक्षक असतात.. अपंग, मानसिक रुग्ण अशा मुलांना पालकांनीच तिथे कायमचे आणून सोडलेलं असते त्यांचे शोषण व हाल तर अतिशय गंभीर असतात..तसेच काहीसे वेश्या वस्तीतील मुलांचे आयुष्य असते.. चांदनी बार या सिनेमातील हतबल आई अतिशय समर्पक उदाहरण म्हणता येईल..

प्रत्येक गोष्टीत मुलांचा सहभाग, त्यांनी व्यक्‍त होणे, त्यांना आवडेल ते शिकणे हा पण त्यांचा अधिकार आहे हे कित्येकदा पांढरपेशा व उच्च वर्गातील आई-वडिलांना सांगावे लागते हे शिक्षक व समुपदेशकाचे दुर्दैव म्हणावे लागेल.. आपला  हट्ट व स्टेटसला शोभेल असेच शिक्षण, कला, खेळ मुलांनी आत्मसात कराव्यात हा हेका खूप ठिकाणी दिसून येतो व कित्येकदा मुले या त्रासाला कंटाळून घर सोडतात, निराशेपोटी व्यसनात, चुकीच्या संगतीला लागतात तर हेकेखोर होऊन बंड पुकारतात नाहीतर स्वतःचा जीव धोक्यात घालतात.. त्यामुळे मुलांच्या मनाचा, आवडीचा कल विचारात घेणे महत्त्वाचे असते.. कारण नंतर फक्‍त वियोगाचे दुःख पदरी येते...

ग्रामीण भागात तर रोजची जगण्याचीच लढाई इतकी भीषण असते की हा हक्‍कांचा विचार लांबवर कुठेही नसतोच.. शहरी भागात मुलांच्या भविष्याचा विचार आम्हीच करणार या नावावर त्यांच्यावर स्वतःची मते लादणे ही पालकांची पळवाट असते. यासाठी पालकांचीच मते, विचार यात बदल होणे गरजेचे आहे.. मी म्हणेन तीच पूर्व दिशा हा अहंकार आला की घरात भेद हा होतोच.. त्यामुळे लहान असो वा मोठे प्रत्येकाच्या मताचा आदर व विचार झाला तरच उद्याची पिढी ही सुद‍ृढ नागरिक होईल हा विचार मनामनात हवाच.  

मेरे प्रभू मुझे इतनी उंचाई कभी मत देना.. की,
अपनोको गले लगा ना सकू...,
मेरे दिल को हमेशा बच्चा रखना...
ताकी हर बच्चे के दिल की ,
आगाज हमेशा सून सकू...,