Sun, Jul 05, 2020 01:51होमपेज › Kasturi › सूर निरागस हो...

सूर निरागस हो...

Published On: Sep 05 2019 1:45AM | Last Updated: Sep 04 2019 8:27PM
स्नेहल अवचट

आपली हिंदू संस्कृती ही उत्सवप्रिय  आहे. प्राचीन काळापासूनच सण, समारंभ एकत्रित येऊन साजरे करण्याची व आनंदाची देवघेव करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. त्यात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन म्हणजे चैतन्य, उत्साह, आनंद याचेच साम्राज्य असते. हम आ रहे है या आगमनाने चराचर सुखावत असतो. होश उड़ानेवाला हाय जोश असतो. कितीही साग्रसंगीत तयारी असेल तरी, कुछ तो  अभी बाकी है। असेच मनाला वाटत असते!

श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचा शनिवार वाड्यातील गणेश महाल म्हणजे अखिल पुणेकरांचे श्रद्धास्थान होते. पेशव्यांनी या घरगुती उत्सवाला जाहीर स्वरूप दिले व राजाचा पावलावर पाऊल टाकत जनतेने देखील हा उत्सव पालखीतून वाजतगाजत  मिरवणूक काढत  दिमाखदाररीत्या ती प्रथा आजतागायत चालू ठेवली आहे. 

1893 साली पुण्यात दंग झाला. जनतेचे मन काहीतरी भरीव कामात गुंतवावे यासाठी भाऊसाहेब रंगारी यांच्या घरी एक सभा ठेवली. ज्यात द्रष्टे लोकमान्य टिळक व इतर मान्यवरांच्या मनात सार्वजनिक गणेशोत्सव ही कल्पना उदयास आली. कामधंदा करून दमलेले जीव एकतर चकाट्या पिटणे वा दारूने  झिंगून रस्त्यावर लोळणे किंवा बायका मुलांना मारहाण करणे, नाहीतर तमाशाची अचकट विचकट नाचगाणी बघून संसाराचा खेळखंडोबा करत होते. यापेक्षा जर मिळून सारे आनंदात त्या बुद्धिदात्या गजाननाच्या भक्‍तीत तल्लीन होणे जास्त हिताचे होईल असा विचार झाला. जातीपातीला शून्य थारा हा  उदात्त हेतू यामागे होता.

गणेशोत्सवाचे व्यासपीठ म्हणजे कलाकारांना  पर्वणी होती. हक्काच्या या मंचावर विविध पोषाख, भक्‍तिरसाने ओथंबलेली गाणी, कर्णमधुर आलाप ही श्रोत्यांना सांस्कृतिक  व सांगीतिक मेजवानी होती. विविध स्पर्धा, कार्यक्रम, नाटिका, अन्नकोट यात दहा दिवस तृप्ततेत जायचे. समाज हा कायम प्रवाही असतो. या जिवंतपणाच्या लक्षणात बदल हे अपेक्षित असतातच. मधल्या काळात या उत्सवाला गालबोट लागले. गल्लोगल्ली मांडव, वर्गणीची दादागिरी, कर्णकर्कश्श स्पीकरवर बीभत्स गाणी लावून दारूने तर्र होऊन नाचणे, ध्वनी व वायू प्रदूषण, कचरा व घाणीचे साम्राज्य यामुळे सार्वजनिक उत्सवाबद्दल समाजात मतप्रवाह बदलू लागले. 

काही जाणकार मंडळांच्या कार्यकर्त्यांनी यात सुवर्णमध्य काढला. उत्स्फूर्त देणगीदार वाढले, त्यामुळे  वर्गणी हा त्रास कमी झाल्यामुळे  मध्यमवर्गीय कुटुंबांना तो एक दिलासा मिळाला. सामाजिक स्तरावर एकोपा व बंधुभाव जपून सामाजिक भरीव कामगिरीत वाढ होऊ लागली. तरुणाईचा उत्साह, त्यात 12-12 तास नोकरी करूनदेखील समाजाचे देणे देण्यासाठी ती व्यग्र होऊ लागली. 

नवीन तंत्रज्ञान यामुळे विचारशक्‍तीला चालना मिळू लागली. सजावट,  सामाजिक भान ठेवणारे देखावे, जिवंत   नाटिका यात रंग भरू लागले आहेत. ढोल-ताशा पथक दिवसभराचे श्रम विसरून आपला रियाझ नेटाने चालू ठेवू लागले आहेत. विविध स्पर्धांद्वारे कित्येक मंडळे अंध, अपंग, वृद्ध, गरजू विद्यार्थी व हतबल रुग्ण यांसाठी काम करणार्‍या संस्थांकडे दरवर्षी भरीव रक्कम देऊ लागले आहेत. दहा दिवस आपले रोजचे काम करून संध्याकाळी  सहा ते दहा या वेळात जिवंत देखाव्याद्वारे जळजळीत सामाजिक समस्या व ऐतिहासिक देखावा सादर करून प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतात. तरुणांचा उत्साह व सातत्य याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. तरीही अजून खूप गोष्टीत कूर्मगतीने पल्ला गाठणे  चालू  आहे.

सगळीकडे कौतुकाचा विषय म्हणजे आपली  लक्ष्मीरोड,  बेलबागेतून सुरू होणारी गणरायाची विसर्जन मिरवणूक...डोळ्यांचे पारणे फिटेल असे रांगोळीचे गालिचे, ढोल-ताशा पथक, शाळांची लेझीम व टिपरी पथके, कात्यायनी शाळेचा बँड ही वर्षानुवर्षांची परंपरा अजूनही चालूच आहे. मानाच्या गणपतीची दिमाखदार मिरवणूक म्हणजे प्रत्येक पुणेकरांचा सार्थ अभिमान आहे. गर्दी, गोंगाट, ढकलाढकली यावर कित्येक जण ताशेरे ओढत असले  तरीही  याच  मिरवणुकीत भर गर्दीत गेल्या वर्षी एका रुग्णापर्यंत रुग्णवाहिका पोचून त्याला योग्य वेळेत वैद्यकीय सुविधा मिळू शकली, हे महत्त्वाचे. पण  तरीही इतर मंडळांकडून वेळेचे व इतर खूप सारे बदल अपेक्षित आहेत.

तर, असा हा आपला सानथोर सगळ्याचा लाडका, बुद्धीचे दैवत असा बाप्पा मनामनावर अधिराज्य गाजवत असतो. तो येण्याने जणू या दहा दिवसात मिळणारे चैतन्य त्याच्या पुढील वर्षीच्या आगमनापर्यंत आपल्याला पुरणारा ऊर्जेचा साठाच असतो कारण...
 

 माझा गणेश नाही मखरात मावणारा
 आहे प्रकाशरूपे विश्वात कोंदलेला
 रेणूत कोंडलेला बुद्धीस भावणारा
 मूर्ती अमूर्त याची रेखाल काय चित्री
 विज्ञानरूप सूत्री भूगोल ओवणारा