Fri, Apr 26, 2019 19:18होमपेज › Jalna › जिल्हा परिषदेत ई-लर्निंग साहित्य विजेअभावी धूळखात

जिल्हा परिषदेत ई-लर्निंग साहित्य विजेअभावी धूळखात

Published On: Aug 25 2018 1:13AM | Last Updated: Aug 25 2018 12:16AMजालना : अप्पासाहेब खर्डेकर

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे शाळांचे विद्युत बिल भरण्यासाठी स्वतंत्र तरतूद नसल्यामुळे शाळा अनुदानातून व अन्य तडजोडीनुसार मुख्याध्यापकांना विद्युत बिले व अन्य खर्च करावा लागते आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील ई-लर्निंगचे साहित्य विजेअभावी धूळखात पडले आहे.

जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात 1 हजार 552 शाळा असून, शंभर टक्के शाळा ई-लर्निंग झाल्या आहेत, परंतु जिल्हा परिषद शाळेस विद्युत बिल भरण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्याने जिल्ह्यात जवळपास 400 ते 450 शाळेतील ई-लर्निंगचे साहित्य विजेअभावी धूळखात पडल्याचे चित्र दिसून येत आहे. दहा वर्षांपूर्वी निधीची तरतूद बंद झाल्याने आता मिळणार्‍या पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळेस पाच हजार तर सातवीपर्यंतच्या शाळेस साडेबारा हजार रुपये शाळा अनुदानातून वीज बिलाचा भरणा करावा लागत आहे. शिवाय शाळा दुरुस्ती, रंगरंगोटी, शैक्षणिक साहित्य आदी खर्च त्यातूनच करावा लागतो. त्यामुळे मुख्याध्यापकांना वीजबिल भरताना अनेक अडचणी येत असल्याने जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळेतील संगणक वापराविना पडून असल्याचे चित्र दिसत आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळा आता डिजिटल झाल्याने प्रत्येक शाळेला  संगणक देण्यात आल्याने सर्वत्र ई-लर्निंग सुरू झाले. त्यात पूर्वी दोन-तीनशे रुपयेयेणारे बिल आता हजारात येत असल्याने रक्कमे अभावी वीज बिल थकल्यास वीज वितरण कंपनीकडून थकबाकीसह विद्युत बिल दिले जात आहे. हे बील अदा करणे आवाक्यात येत नसल्याने शाळांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत आहे. अशा प्रकारामुळे शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी   जिल्हा परिषद शाळेचे विजबिल ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून भरण्याचा निर्णय सरपंच यांनी घेण्याची गरज आहे