Mon, Aug 19, 2019 10:01होमपेज › Jalna › वडीगोद्रीत दरोडेखोरांचे मार्च एंडचे टार्गेट?

वडीगोद्रीत दरोडेखोरांचे मार्च एंडचे टार्गेट?

Published On: Mar 24 2018 2:13AM | Last Updated: Mar 24 2018 1:40AMवडीगोद्री : प्रतिनिधी

वडीगोद्री परिसर, गोंदी पोलिस ठाण्याहद्दीत व औरंगाबाद -सोलापूर महामार्गावर मार्च महिन्यात दरोडे व चोर्‍यांच्या घटनेत अचानक वाढ झाल्याने दरोडेखोर व चोरटे मार्च एण्डचे टार्गेट पूर्ण तर करीत नाही ना! अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. दरोड्यासोबतच गुटखा व अवैध धंद्यानीही मार्चमध्येच डोके वर काढल्याने मार्च महिना गोंदी पोलिसांसाठी कसोटीचा ठरत आहे. 

औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडीगोद्री परिसरात  होत असलेल्या  दरोड्याच्या घटनेत मार्च महिन्यात मोठी वाढ झाली आहे.  त्यामुळे या मार्गावरील रात्रीचा प्रवास प्रवासी व नागरिकांसाठी काळजीचा बनला आहे. 28 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील डोणगाव फाट्याजवळ चोरट्यानी चाकूचा धाक दाखवून ट्रकचालकाला मारहाण करून त्याच्याजवळील रोख 7 हजार रुपये व 9 हजार 300 रुपये किमतीचा मोबाइल असे मिळून 17 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला होता. त्या घटनेचा तपास लागलेला नसतानाच  4 मार्च रोजी  राजेंद्र भाळे यांची तर 8 मार्च रोजी लहू खेडकर यांची मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली.  9 मार्च रोजी अंबड तालुक्यातील बळेगाव येथील शेतकर्‍याच्या  घराचे चॅनल गेटचे कुलुप तोडून चोरटयांनी  65 हजार रुपये चोरून नेले.10 मार्च रोजी लखमापुरी व सुखापुरी येथे चार ठिकाणी सशस्त्र दरोडयात अंदाजे 15 लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला. या वेळी श्‍वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करूनही उपयोग झाला नाही.  13 मार्च रोजी  औरंगाबाद -सोलापूर महामार्गावर दाभरूळ-थापटी जवळ दरोडेखोरांनी धावत्या कारवर हल्ला करून  एक लाख 34 हजार रुपयांची लूट करीत एका जणाचा खून केला. तर एकास गंभीर जखमी केले. 20  मार्चच्या मध्यरात्री औरंगाबाद -सोलापूर महामार्गावर सुंदरम जिनिंगजवळ  टेम्पो चालक इस्माईल रुबाब पिंजारी (रा. सूरत) याला मारहाण करून दरोडेखोरांनी 10 हजार रोख  व एक मोबाइल लुटला. 

त्यात  5 ते 6 दरोडेखोरांच्या अंगावर ट्रक घालून ट्रकचालक पसार झाला. या घटनेत  दोन दरोडे खोरांचे मुले जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरोडे व चोर्‍यानंतर काही काळ तपास केला जातो, मात्र येरे माझ्या मागल्या या म्हणीप्रमाणे चोर व दरोडेखोर पुन्हा नवीन गुन्ह्यास जन्म देतात. चोर पोलिसांच्या खेळात आज चोर व दरोडेखोर पोलिसांना भारी पडत असल्याचे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे.