होमपेज › Jalna › वालसा वडाळ्यात पाण्यासाठी भटकंती

वालसा वडाळ्यात पाण्यासाठी भटकंती

Published On: Feb 21 2018 1:21AM | Last Updated: Feb 21 2018 1:21AMमाहोरा : प्रतिनिधी   

भोकरदन तालुक्यातील वालसा वडाळा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. गावात प्रशासनाच्या वतीने तत्काळ टँकर सुरू करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.

चार हजार लोकसंख्या असलेल्या वालसा वडाळा गावात डिसेंबर महिन्यापासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नळाला येणारे जेमतेम पाणीही महिन्याभरापासून आले नाही. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने विहिरीची पाणी पातळी खालवली आहे. तसेच गावाताली हातपंप नादुरुस्त असल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावालगत असलेल्या विहिरीत पाणी आहे. यावरच पाणी भरण्यासाठी सकाळपासून महिलांची गर्दी झालेली दिसून येते. काही ग्रामस्थ शेतातून पाणी आणत आहे. पाणीपुरवठा संदर्भात जिल्हा प्रशासनाच्या वतीने एकही योजना राबविण्यात आली नाही. यामुळे ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत आहे. तसेच वालसा गावातील राऊतवाडी, फुसेवाडी, पायघण वाडी, धनगरवाडी, जगताप वाडी या भागात ही पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

महिलांची धावपळ
सकाळी घरातील कामाची लगबग त्यातच पाणीटंचाई निर्माण झाल्याने काम सोडून विहिरवर पाण्यासाठी जावे लागते. बराच वेळ पाणी भरण्यात जात असल्याने महिलांची धावपळ वाढली आहे. पाण्यामुळे सकाळच्या कामाचे नियोजन बिघडले आहे. ग्रामपंचयातीने लक्ष देऊन गावातील पाणी प्रश्‍न सोडवा.
- सपना राऊत, गृहिणी 

टँकर सुरू करावे
या भागातील विहिरींनी तळ गाठळा आहे. हीच परिस्थिती राहिल्यास एक महिन्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली. ग्रामस्थांना महिलांना भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाने पाणी टंचाई समस्या लक्षात घेऊन गावात टँकर सुरू करण्यात यावे.
- दिलीप इंचे, ग्रामस्थ

ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील पाणीटंचाई लक्षात घेऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे. दोन महिन्यांपासून पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. गावात तत्काळ टँकर सुरू करण्यात यावे, नसता महिलांच्या वतीने ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा काढण्यात येईल.
- सखूबाई तोंडे, गृहिणी, वालसा 

पाणीटंचाईचा प्रस्ताव  भोकरदन पंचायत समितीमध्ये 15 जानेवारील दाखल करण्यात आला आहे. पंचायत समितीच्या वतीने आजपर्यत टँकर सुरू केले नाही. पुन्हा प्रस्ताव देऊन टँकर लवकर सुरू करण्याचा येईल.
- शंकर तेलंग्रे, उपसरपंच, वालसा