Sun, Jul 21, 2019 07:51होमपेज › Jalna › चक्‍का जाम, अभूतपूर्व बंद

चक्‍का जाम, अभूतपूर्व बंद

Published On: Aug 10 2018 12:57AM | Last Updated: Aug 10 2018 12:57AMजालना : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात  गुरुवार, 9 ऑगस्ट रोजी अभूतपूर्व बंद पाळण्यात  आला. यावेळी शहरी व ग्रामीण भागात कडकडीत बंदमुळे व्यवहार ठप्प झाले. जिल्ह्याचा चक्का जाम झाल्याचे पाहवयास मिळाले. अनेक ठिकाणी बैलगाडी व गुरे ढोरे रस्त्यावर उभे करून रास्ता रोको करण्यात आला. चारही आगारांतून एकही बस रस्त्यावर येऊ शकली  नाही. जालना रेल्वे स्थानकात नांदेड-अमृतसर रेल्वे आंदोलकांनी अडवली.

शहरात मंठा चौफुली, अंबड चौफुली, कन्हैयानगर चौफुली व भोकरदन रोडसह औरंगाबाद रोड तसेच संभाजी उद्यान आदी ठिकाणी सकल मराठा बांधवांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. रेल्वे स्थानकात दुपारी दीड वाजेच्या सुमारास नांदेड- अमृतसर रेल्वे आडविण्यात आली.यावेळी आंदोलकांची समजूत काढल्यानंतर पंधरा मिनिटे उशिराने ही रेल्वे मार्गस्थ झाली. शहरातील संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद होती. अनेक वर्षांनंतर शहरवासीयांनी अशा प्रकारचा बंद पहिल्यांदाच अनुभवला.यावेळी शहरातून मोटारसायकल रॅली काढून तरुणांनी बंदचे आवाहन केले. बंदच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांनी सर्व शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याबाबतचे पत्र बुधवारी प्रसिध्दीस दिले होते. त्यामुळे गुरुवारी सर्व शाळा व महाविद्यालये बंद होते. जिल्ह्यातील जालना, परतूर, अबंड व जाफराबाद आगारातून एकही बस रस्त्यावर आली नाही. अंबड चौफुली येथे आंदोलकांनी रस्त्यावर जेवण केले.

111 जणांनी मुंडण करून नोंदवला निषेध

शहरासह तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदमुळे रस्ते निर्मनुष्य झाल्याचे दिसून आले. मच्छिंद्र चिंचोली येथे 111 जणांनी मुंडण करून निषेध नोंदवला. अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आंदोलनकर्त्यांनी शासनाविरोधी जोरदार घोषणाबाजी केली.  यावेळी आरक्षण आमच्या हक्काच, नाही कुणाच बापाच, एक मराठा, लाख मराठा आदी घोषणांनी चिंचोली परिसर दणाणून गेला.अत्यावश्यक सेवा म्हणून ओळखल्या जाणारे दवाखाने, मेडिकल दुकाने, बँका सुरू होत्या. गुरूपिंपरी येथे चक्का जाम अंदोलन करत आंदोलकांनी  भजन व मुंडण करून शासनाचा निषेध करण्यात आला. शहरात पोलिस कर्मचार्‍यांना बंदच्या काळात मराठा समाजबांधवांनी बिस्किटे वाटप केली. अंबड बसस्थानाकातून एकही बस सोडण्यात न आल्याने घनसावंगी बसस्थानकात शुकशुकाट होता. शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. 

रस्त्यावर टाळ कुटून ठिय्या आंदोलन 

तालुक्यात गुरुवारी कडकडीत बंद पाळण्यात आला.  छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅली काढण्यात आली. मेसखेडा येथे टाळ-मृदंगाच्या साथीत रस्त्यावर भजन करण्यात आले. छत्रपती संभाजी राजे चौकात करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनात पाटोदा, जयपूर, विडोळी, गेवराई, खारी, आर्डी, वांजोळा, नानसी, देवठाणा  यासह तालुक्यातील  सकल मराठा समाजाबांधव सहभागी झाले होते. तालुक्यातील मेसखेडा येथे  गावकरी कुटुंब व गुराढोरांसह रस्त्यावर ठिय्या देऊन बसले होते. 

यावेळी चार गावांतील भजनी मंडळाच्या वतीने दिवसभर भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सकाळपासूनच गावकर्‍यांनी आपले ट्रॅक्टर, बैलगाड्या रस्त्यावर आणून उभ्या केल्या होत्या. यामध्ये मेसखेड्यासह पिंपरखेडा, लिंबोना, सावरगाव येथील  मराठा बांधव सहभागी झाले होते. दुपारी चार वाजता रस्त्यावरच सामुदायिक जेवण करून  आंदोलनाची सांगता करण्यात आली. यात शालेय विद्यार्थी व महिलांचा लक्षणीय सहभाग होता. ढोकसाळ पाटीवर वाघोडा  वाढेगाव, पांढुर्णा लिंबेवडगाव पाटीवर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.