Sun, Apr 21, 2019 05:48होमपेज › Jalna › ५२ गावांची तहान ६० टँकरवर 

५२ गावांची तहान ६० टँकरवर 

Published On: May 03 2018 1:28AM | Last Updated: May 03 2018 12:11AMजालना : प्रतिनिधी

वाढत्या तापमानाबरोबरच पाणी प्रश्‍न गंभीर होत चालला आहे. जिल्ह्यात 52 गावे व 5 वाड्यांची तहान 60 टँकरवर भागवली जात आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी 57 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 

जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट दिवसेेंदिवस गडद होत चालले आहे. जालना तालुक्यातील एका टंचाईग्रस्त गावासाठी 2 खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. बदनापूर तालुक्यातील 1 गावास एका खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. भोकरदन तालुक्यात 27 गावे व 4 वाड्यांना 9 शासकीय व 26 खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जाफराबाद तालुक्यात 21 गावे व तहानलेल्या एका वाडीस 9 शासकीय व 11 खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. परतूर तालुक्यात 1 गावास 1 शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. मंठा व अंबड तालुक्यात एकही टंचाईग्रस्त गाव नसल्याने या गावात टँकर नाही. घनसावंगी तालुक्यात 1 गावास 1 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पाणी टंचाईग्रस्त गावांसाठी 191 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहेे. त्यात जालना तालुक्यासाठी 16, बदनापूर 1, भोकरदन 72, जाफराबाद 55, घनसावंगी 1 विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 7 मध्यम व 57 लघु तलावांतील पाणी पातळीही झपाट्याने खालावत आहे.

पुरेसा पाणीसाठा असूनही 12 दिवसांआड पाणी

वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्याच्या ठिकाण असलेल्या जालना शहरात तब्बल दहा ते बारा दिवसांपासुन पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्‍त केला जात आहे. शहरास पाणीपुरवठा करणार्‍या घाणेवाडी व जायकवाडी जलाशयात पुरेसा पाणीसाठा असतानाही नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरातील मोजक्याच सार्वजनिक बोअर सुरू आहेत.

भोकरदन व जाफराबाद तालुक्यात सर्वाधिक टँकर सुरू असून त्यात 60 हजार 951 लोकसंख्येच्या 27 गावे व 4 वाड्यांसाठी 9 शासकीय व 26 खासगी टँकरद्वारे तर जाफराबाद तालुक्यातील 34 हजार 132 लोकसंख्येच्या 21 गावांसाठी 11 खासगी व 9 शासकीय टँकरने पाणीपुरवठा होत आहे.