Wed, Apr 24, 2019 00:08होमपेज › Jalna › प्रतिनियुक्त्या रद्द करण्याचे आदेश देऊनही सोईचे गाव सोडण्यास तयार नाहीत

‘त्या’ शिक्षकांसाठी दुसर्‍यांदा आदेश

Published On: May 31 2018 1:36AM | Last Updated: May 30 2018 11:09PMभोकरदन : विजय सोनवणे 

भोकरदन तालुक्यात प्रतिनियुक्‍तीवर असलेल्या शिक्षकांचा प्रश्‍न चांगलाच गाजत आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांनी दोन वेळेस आदेश काढूनही शिक्षक प्रतिनियुक्‍तीच्या सोयीच्या गावावरून हलण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. 

मागच्या काही वर्षांपासून आपली शाळा सोडून वरिष्ठांच्या व राजकीय नेत्यांच्या वरदहस्ताने जिल्हा परिषद अंतर्गत येणार्‍या व विविध कार्यालयात प्रतिनियुक्‍तीवर गेलेल्या शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या तातडीने रद्द करण्याचे आदेश जिल्हा पषदेच्या शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकार्‍यांना दिले आहेत. 

या पूर्वी राज्याच्या ग्राम विकास विभागाच्या सचिवांनी असे आदेश दिलेले असतानाही बस्तान बसविलेल्या शिक्षकांना अधिकार्‍यांनी पाठीशी घातल्याने आता परत या आदेशाची अंमलबजावणी होईल अशी शक्यता कमीच असल्याचे मत शिक्षकांमधुन व्यक्‍त होत आहे.28 मे रोजी जालन्याचे शिक्षणाधिकारी यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हापरीषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांनी दिलेल्या सुचनांचे संदर्भ देऊन सर्व पंचायत समिती अंतर्गत शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या तत्काळ रद्द करण्यासंदर्भात पत्र पाठवले. 

पत्राद्वारे दिला होता इशारा 

या पत्रात सर्व प्रकारच्या प्रतिनियुक्त्या तातडीने रद्द करण्याचे आदेश दिलेले आहेत. शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या तात्काळ रद्द करून तालुक्यात एकही प्रतिनियुक्‍ती नाही असे प्रमाणपत्र 28 मेपर्यंत सादर करण्याचेआदेश देण्यात आले आहे. यानंतरही प्रतिनियुक्‍तीआढळली तर संबधित अधिकार्‍यास जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा पत्रात देण्यात आला आहे. 

यापूर्वीच शिक्षणाधिकार्‍यांनी यासंदर्भात भोकरदन येथील गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून शिक्षकांच्या झालेल्या प्रतिनियुक्त्यांची माहिती मागवली होती. तेव्हा अनेक शिक्षक काही गटशिक्षणाधिकारी कार्यालयात तर काही जण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालना, राष्ट्रीय माध्यमीक शिक्षा अभियान शिक्षण विभाग, जिल्हा परीषदेच्या जलस्वराज स्वच्छ भारत मिशन कक्षात, तर जिल्हा परीषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापतींकडे काम करीत असल्याचे अहवालावरून दिसत होते.