Sun, Mar 24, 2019 17:00होमपेज › Jalna › वीस वर्षांपासून तालुक्याची प्रतीक्षा..!

वीस वर्षांपासून तालुक्याची प्रतीक्षा..!

Published On: May 05 2018 12:49AM | Last Updated: May 04 2018 11:38PMश्रीक्षेत्र राजूर : दीपक  पारवे 

गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तालुक्यांची निमिर्र्ती केली जाते.  भोकरदन तालुक्यातील तीर्थक्षेत्रामुळे नावारूपाला आलेल्या राजूर गावास तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी जोर धरत आहे. गत वीस वर्षांपासून हा प्रश्‍न लालफितीत आहे.

राज्यात 358 तालुके आहेत. मात्र, 1967 ते 1999 या  38 वर्षांच्या काळातील सात मुख्यमंत्र्यांनी 144 तालुक्यांची झपाट्याने निर्मिती करून ग्रामीण भागाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे.  लोकसंख्येनुसार यापुढे तालुक्यांची निर्मिती होणे आवश्यक आहे. परंतु लोकप्रतिनिधींच्या उदासीनधोरणामुळे अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील तालुक्यांची निर्मिती रखडलेली आहे. विशेेष म्हणजे जालना जिल्ह्यातील श्रीक्षेत्र राजूरचा  पर्यटन, धार्मिक, ग्रामीण तीर्थक्षेत्र आदी बाबींमध्ये  समावेश आहे. भौगोलिकदृष्ट्या सक्षम आहे. तर  70 गावांचा पाठिंबा असलेल्या राजूरला राज्य सरकारने तालुक्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी सर्वस्तरातून केली जात आहे.

राज्य सरकारने तालुका निर्मितीबाबत निकष ठरविलेले आहे. तालुक्यांचे विभाजन करण्यासाठी समिती गठीत केलेली आहे. जालना जिल्ह्यातून एकमेव राजूर तालुका निर्मितीच्या प्रतीक्षेत आहेत. राजूर तालुका होण्यासाठी शासनदरबारी 2011 पासून पाठपुरावा सुरू आहे. सात वर्षांपासून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, तालुका कृती समिती, सर्वपक्षीय कार्यकर्ते आदी आंदोलने करीत आहेत. सरकारने अद्याप दखल घेतलेली नाही. 1 मे रोजी याविषयावर सर्वपक्षीयांनी आंदोलनही केले.