Tue, Jul 16, 2019 01:35होमपेज › Jalna › पेपर अवघड गेल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

पेपर अवघड गेल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

Published On: Mar 05 2018 1:42AM | Last Updated: Mar 05 2018 12:37AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

रसायनशास्त्राचा पेपर अवघड गेल्याने तणावात असलेल्या एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी प्रकाशनगर भागात घडली आहे. ऋतुजा किसन बिरबहकुटे (18, रा. प्रकाशनगर, मुकुंदवाडी) असे आत्महत्या करणार्‍या तरुणीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतुजा ही शहरातील एका महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होती. परीक्षेमध्ये तिला रसायनशास्त्राचा पेपर थोडा अवघड गेला होता. 
ही बाब तिने आपल्या घरात देखील बोलून दाखविली होती. शुक्रवारी धुळवड असल्याने घरातील सर्व कुटुंबाने आनंदाने रंगांची उधळण केली. त्यानंतर ऋतुजा ही अभ्यास करण्यास जात असल्याचे सांगून खोलीत गेली होती. तर कुटुंबातील इतर सदस्य हे झोपी गेले होते. दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास आईने चहा बनविल्यानंतर ऋतुजाला आवाज दिला. मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने घरातील सर्व लोक उठले. 

त्यांनी दरवाजा तोडला असता ऋतुजाने खोलीतील फॅनला ओढणी बांधून गळफास घेतल्याचे दिसले. त्यामुळे घरातील लोकांनी पोलिसांना फोन करून तिला शेजार्‍यांच्या मदतीने घाटीत आणले. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

 ऋतुजा ही आई-वडिलांना एकुलती एक मोठी मुलगी होती, तिला एक लहान भाऊ आहे. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात
आली आहे.