Wed, Nov 21, 2018 14:21होमपेज › Jalna › शिवजयंतीदिनी आदर्श विवाह 

शिवजयंतीदिनी आदर्श विवाह 

Published On: Feb 21 2018 1:21AM | Last Updated: Feb 21 2018 1:21AMजालनाः प्रतिनिधी

शिक्षणाचे महत्त्व, स्वच्छतेचा संदेश देत आसरखेड्यात शिवजयंतीदिनी आदर्श विवाह सोहळा पार पडला. डीजेचा धुमधडाका, नाचगाणे आणि इतर सर्व खर्चाला फाटा देत हा विवाह बदनापूर तालुक्यातील आसरखेडा येथे साधेपणाने पार पडला. 

गणेश आणि रमेश काकडे यांची कन्या शिवकन्या यांचा आदर्श विवाह चर्चेचा विषय ठरला. कारण शिवजयंती तर साजरी करायची मात्र ती पारंपरिक पद्धतीने नव्हे तर शिवाजी महाराजांना अभिप्रेत अशा प्रकारची, असे पटवून देण्यात आल्यानंतर या कार्यास सर्वांनीच होकार दिला. 

शिवप्रतिमेचे पूजन
लग्नसोहळ्या पूर्वीच शिवप्रतिमेचे पूजन करून शिवजयंती साजरी करण्यात आली. विवाह सोहळ्यासाठी पांडुरंग नन्नवरे आणि रमेश काकडे, विठ्ठल नन्नवरे, अंबादास नन्नवरे, सूर्यभान नन्नवरे, भुजंगराव नन्नवरे आदींनी सहकार्य केले. याप्रसंगी विविध पक्षांतील राजकीय नेत्यांसह गावकरी आणि आप्तेष्टांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

मराठा समाजात तिथी वगळून लग्न लावले जात नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या विवाहाला लोक येतील की नाही, अशी चिंता भेडसावत होती. मात्र गावकर्‍यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिवजयंतीचा आदर्श ठेवला आहे. प्रारंभी काही तुरळक मंडळींनी विरोधही दर्शवला. कारण शिवजयंतीच्या दिवशी विवाहसोहळा आयोजित केला तर लोकांनी शिवजयंतीच साजरी करायची नाही का, असा प्रश्‍नही उपस्थित करण्यात आला.