Fri, Nov 16, 2018 13:26होमपेज › Jalna › सौभाग्य योजनेतून २३ हजार घरे उजळणार, ९ कोटींचा खर्च

सौभाग्य योजनेतून २३ हजार घरे उजळणार, ९ कोटींचा खर्च

Published On: Mar 06 2018 1:18AM | Last Updated: Mar 06 2018 1:17AMजालना : प्रतिनिधी

विजेपासून वंचित कुटुंबांना वीजजोडणी देऊन त्यांचे जीवन प्रकाशमान करण्यासाठी सौभाग्य योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. सौभाग्य योजनेत जिल्ह्यातील 23 हजार 397 कुटुंबीयांना वीजजोडणी देण्यात येत आहे. या योजनेमुळे वीज नसलेल्या गरिबांची घरे प्रकाशमान होणार आहेत.

शासनाने जनतेचे जीवनमान प्रकाशमान होण्यासाठी व सर्व समाजातील कुटुंबांपर्यंत मार्च 2019 पर्यंत वीज पोहचविण्यासाठी सौभाग्य योजनेची घोषणा केली. सौभाग्य योजनेत सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागातील 23 हजार 397 कुटुंबांना वीजजोडणी देण्यात येणार आहे. यात दारिद्य्ररेषेखालील 12 हजार 870 कुटुंबांना मोफत वीजजोडणी देण्यात येणार आहे. दारिद्य्ररेषेवरील 10 हजार 527 कुटुंबांना 500 रुपयांत वीजजोडणी देण्यात येणार आहे. हे 500 रुपये लाभार्थी यांनी त्यांच्या बिलातून 10 टप्प्यांत भरावयाचे आहेत. सौभाग्य योजनेत जिल्ह्यात सुमारे 9 कोटी 35 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. 

दारिद्य्ररेषेखालील व वरील कुटुंबांना लाभ

या योजनेत लाभार्थ्यांना घरात वीज जोडणीत मीटर सोबत चार्जिंग पॉइंट, घरातील अंतर्गत वायरिंगसह एक चार्जिंग पॉइंट, एक एलईडी बल्ब मोफत देण्यात येणार आहे. तसेच अतिदुर्गम भागात ज्या ठिकाणी पारंपरिक विद्युतीकरण करणे शक्य नाही, अशा घरांना सौरऊर्जा संचामार्फत वीजपुरवठा करण्यात येईल. त्यांना अंतर्गत वायरिंगसह एक डीसी पंखा, पाच एलईडी बल्ब आणि एक डीसी चार्जिंग पॉइंट मोफत देण्यात येईल. पंतप्रधान आवास योजना, शबरी योजना, रमाई योजना, आदिम योजना व इतर योजनांतून तयार झालेल्या घरांनासुद्धा मोफत वीजपुरवठा देण्यात येणार आहे.