होमपेज › Jalna › दानवेंच्या विरोधात राज्यमंत्री खोतकर?

दानवेंच्या विरोधात राज्यमंत्री खोतकर?

Published On: Mar 14 2018 1:14AM | Last Updated: Mar 20 2018 1:48AMजालनाः सुहास कुलकर्णी

लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काँग्रेस, भाजप, शिवसेनेसह इतर पक्षांनी विविध कार्यक्रमाद्वारे मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. भाजप व शिवसेना ही दोन्ही सत्ताधारी पक्ष एकमेकांच्या विरोधात लढणार आहे. त्यामुळे आगामी 2019 ची लोकसभा निवडणूक रंगतदार होणार आहे. विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध राज्यमंत्री अर्जुन खोतकर लढण्याची शक्यता आहे. 

जालना, परतूर, घनसावंगी, भोकरदन व बदनापूर हे पाच विधानसभा मतदारसंघ असून, जालना लोकसभा मतदारसंघात औरंगाबाद जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश आहे. जालना लोकसभा मतदारसंघात काही अपवाद वगळता या मतदारसंघावर कायम भाजपचे वर्चस्व राहिलेले आहे. भाजपचे विद्यमान खासदार रावसाहेब दानवे सतत चार वेळा निवडून आले आहेत. 

लोकसभेसाठी दानवे सर्वप्रथम 1999 ला निवडून आले. त्यानंतर 2004,2009 व 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळविला. त्यापूर्वी 1990 व 1995 मध्ये भोकरदन विधानसभा निवडणुकीत दानवे यांनी विजय मिळवीत प्रतिनिधित्व केले आहे. आगामी 2019 च्या लोकसभेसाठी पुन्हा भाजपतर्फे खासदार रावसाहेब दानवे हेच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे दिसत आहे. त्यांच्याविरोधात यावेळी शिवसेनेच्या वतीने राज्यमंत्री अर्जुन खोतकर लोकसभेच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.

काँग्रेसचा उमेदवार अद्याप निश्‍चित नसला तरी आयात केलेल्या उमेदवारास ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरविले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी निवडणुकीत शेतकरी कर्जमाफी, मराठा व धनगर समाज आरक्षण, वाढती महागाई, शेतकर्‍यांच्या शेतमालाला भाव नाही . यासह इतर मुद्यांवर भाजपला घेरण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत. काँग्रेसने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराद्वारे, राष्ट्रवादीने हल्‍लाबोल आंदोलन करून तर शिवसेनेने विविध कार्यक्रमांद्वारे निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 

पाचपैकी भोकरदन, परतूर व बदनापूर हे तीन विधानसभा मतदारसंघ भाजपच्या, जालना शिवसेना तर घनसावंगी मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. जालना विधानसभा मतदारसंघात 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांचा अवघ्या 296 मतांनी पराभव केला होता. चौरंगी झालेल्या या निवडणुकीत भाजपचे अरविंद चव्हाण, बसपाचे अब्दुल रशीद पहेलवान यांच्यात चुरशीची लढत  झाली होती.