जालना : प्रतिनिधी
पावसाळा सुरू होण्यासाठी महिनाभराचा अवधी असल्याने तत्पूर्वी पावसाळापूर्व आपत्ती निवारण उपाय योजना झाल्या नाही, तर त्याचा त्रास संपूर्ण शहराला सहन करावा लागणार आहे. यासंदर्भात पालिका प्रशासनाने अद्यापही बैठक घेतलेली नाही.
शहराची लोकसंख्या सुमारे साडेतीन लाखांवर आहे. नागरिकांना रस्ते, वीज, पाणी, आरोग्य आदी सुविधा देणे पालिकेचे कर्तव्य आहे. सांडपाणी व्यवस्थापनांतर्गत भुयारी तसेच उघड्या गटारींची व्यवस्था करण्यात आली आहे; पण गटारीमध्ये कचरा फेकण्याची संस्कृती अलीकडच्या काही वषार्र्ंत फोफावल्यामुळे गटारींचा श्वास कोंडला आहे. सांडपाणी सुरळीतपणे वाहून जात नसल्याने गटारींचे चेंबर डासनिर्मितीची केंद्र बनली आहेत.
पालिका प्रशासनाकडून वेळोवेळी गटारी स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते. पावसाळ्यात रस्त्यावर साचलेले पाणी गटारीतून सुलभतेने वाहून जात नसल्याने रस्त्यावर तसेच रिकाम्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते. तेथेच डास अळ्यांची निर्मिती होऊन डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांना पोषक वातावरण निर्माण होते. गतवर्षी शहरात पावसामुळे काही भागातील घरांमध्ये पाणी गेले होते. पावसाळापूर्व नियोजन गांभीर्याने केले जात नाही. हा अनुभव असतानाही यंदा मे महिन्यातील वीस दिवस उलटूनही पालिका प्रशासनाने पावसाळापूर्व नियोजन केलेले नाही. आरोग्य विभागाला डास उत्पत्ती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करणे, शहरातील धोकादायक इमारतींचा आढावा घेऊन संबंधितांना सूचना देणे, खुल्या गटारीची स्वच्छता, नालेसफाई, नियमित फवारणी आदींचे नियोजन आखले जाते. पालिका प्रशासनाने अद्यापही बैठकच न घेतल्याने बहुतेक कामे लांबणीवर पडली आहेत.
ही कामे रखडली
रस्ते पॅचिंग, धोकादायक इमारती घोषित करून उपाययोजना, डास निर्मूलनासाठी प्रभावी उपाय योजना, नाले सफाई, तुंबलेल्या गटारीकडे दुर्लक्ष, सकल भागात पाणी साचू नये, यासाठी उपाययोजना हाती घेण्याकडे मनपाचे दुर्लक्ष झाले. नाल्यांतील अतिक्रमणांवर कारवाई, नदी पात्रातील अतिक्रमण काढण्याचे कामही रखडले आहे.
पावसाळ्यापूर्वी मोठे नाले, अंतर्गते नाली सफाईचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या दोन दिवसांत नाले सफाईचे काम सुरू होईल. पावसाचे पाणी थांबणार नाही, अशी काळजी घेण्यात येईल.
-महादेव जमधडे, स्वच्छता विभागप्रमुख