Mon, Jun 24, 2019 20:58होमपेज › Jalna › जाफराबाद, मंठा तालुक्यात रोहिण्या बरसल्या

जाफराबाद, मंठा तालुक्यात रोहिण्या बरसल्या

Published On: Jun 01 2018 1:59AM | Last Updated: May 31 2018 11:30PMजाफराबाद/मंठा : प्रतिनिधी

प्रचंड उकाडा वाढल्याने गुरुवारी वादळी वार्‍यासह रोहिण्यांनी हजेरी लावली. शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी चारनंतर अवकाळी वादळीसह तब्बल वीस मिनिटे पाऊस झाला. 

दोन-तीन दिवसांपासून उकाड्यात वाढ झाली असून शरीरातून घामाच्या धारा वाहत आहे. गुरुवारी ही उकडा जाणवत होता, परंतु सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दुपारी चारच्या सुमारास जोरदार वादळी वार्‍यासह पाऊस झाला.  हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार यावर्षी वेळेवर पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तालुक्यातील काही गावात अवकाळी वारे व पाऊस यामध्ये गावातील विजेचे खांब कोसळले व तार तुटून पडल्याने विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला. गावातील मंदिरासह घरावरील पत्रे उडाल्याने गावकर्‍यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. घरावरील पत्रे व काही घरांच्या भिंती पडून पडझड झाल्याने अनेकांचे संसारोपयोगी साहित्यही पावसात भिजले. 

मंठा तालुक्यात गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रोहिण्या बरसल्या. मान्सूनपूर्व झालेल्या वादळी वार्‍यासह पावसाने तालुक्यातील जयपूरसह कोकरसा, दहा, माळेगाव परिसरात हजेरी लावली. तालुक्यातील काही गावात अवकाळी वारे व पाऊस यामध्ये गावातील विजेचे खांब कोसळले.