Sun, Jul 21, 2019 16:49
    ब्रेकिंग    होमपेज › Jalna › केळीपासून चिप्स बनविणारा प्रक्रिया उद्योग

केळीपासून चिप्स बनविणारा प्रक्रिया उद्योग

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 24 2018 12:05AMजालना : प्रतिनिधी 

बदनापूर तालुक्यातील डोंगरगाव  येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय हा शेतीच आहे.  अत्यल्प शिक्षण, उद्योग, व्यवसायाचा अनुभव नसतानाही केवळ इच्छाशक्ती, चिकाटी व जिद्दीच्या जोरावर ईश्वरदास घनघाव यांनी कृषी उद्योजकता विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून अनुदान घेऊन केळीपासून चिप्स बनविणारा प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे. 

काहीतरी करून दाखविण्याच्या जिद्दीने त्यांनी खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात या उद्योगाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. तसेच मराठवाडा कृषी विद्यापीठातून फळे व भाजीपाल्यावर प्रक्रिया करणार्‍या उद्योगाचे संपूर्ण प्रशिक्षण घेऊन आपल्या शेतातच केळीवर प्रक्रिया करून त्यापासून चिप्स बनविण्याचा उद्योग सुरू केला. घरातीलच भाजी करण्याची कढई व घरातीलच स्वयंपाक करणारी चूल या साहाय्याने ते चिप्स बनवत होते.  

यासाठी लागणारी हिरवी केळी जालना येथील बाजारामधून विकत घेऊन त्याच्या साली काढून किसणीच्या साहाय्याने चिप्स बनवणे, चिप्स तळणे, त्यावर मसाला टाकणे व नंतर हातानेच पॅकिंग करणे आदी कामांसाठी अधिक प्रमाणात वेळ लागत होता, परंतु सन 2016-17 या आर्थिक वर्षामध्ये कृषी उद्योजकता विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून घनघाव यांनी या प्रक्रिया उद्योगसाठी अनुदान मिळण्याबाबत अर्ज सादर केला व व्यवसाय करण्याची त्यांची जिद्द, चिकाटी पाहून त्यांना या कार्यक्रमांतर्गत 10 लक्ष रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले. अत्याधुनिक मशीनच्या साहाय्याने दर ताशी 1 हजार 500 चिप्सच्या पॅकेटची निर्मिती केली जाते. या व्यवसायातून अनेक बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला आहे.  

समाजामध्ये आजघडीला अनेक बेरोजगार तरुण आहेत.  शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन स्वत: उद्योग उभारून स्वत:च्या पायावर उभे रहावे.  जालना जिल्ह्यात फक्त आवळा व केळी या फळपिकांवरच प्रक्रिया करणारे उद्योग असून, इतरही फळपिकावर प्रक्रिया करणार्‍या उद्योगाची उभारणी करण्यासाठी जिल्ह्यात मोठा वाव असून जिद्द, चिकाटी व मेहनत करण्याची तयारी असल्यास नोकरदारापेक्षा अधिक प्रमाणात आपण पैसा कमवू शकतो, असा विश्‍वास घनघाव यांनी व्यक्त केला. 

केळीपासून उत्पादित केलेल्या चिप्सला मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात मागणी असून त्यांचा माल औरंगाबाद, बीड, परभणी, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोलीसह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांतही मोठ्या प्रमाणात विकला जातो.