Tue, Jul 23, 2019 04:02होमपेज › Jalna › पोलिस बंदोबस्तात ‘पद्मावत’चे खेळ

पोलिस बंदोबस्तात ‘पद्मावत’चे खेळ

Published On: Jan 26 2018 1:21AM | Last Updated: Jan 26 2018 12:19AMजालना : प्रतिनिधी

पद्मावत चित्रपटास विरोध करीत बुधवारी उशिरा रात्री दोन चित्रपटगृहांवर दगडफेक करण्यात आली. यात चित्रपटगृहाच्या काचा फुटल्या. या प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली. दरम्यान, राजपूत समाजातील प्रतिष्ठितांसाठी पोलिसांनी गुरुवारी विशेष शोचे आयोजन केले होते. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात चित्रपटांचे खेळ सुरू झाले. 

नीलम, रत्नदीप व नटराज या तीन चित्रपटगृहांत पद्मावत चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळताच बुधवारी (24) रात्री काही जणांनी चित्रपटगृहावर दगडफेक केली. यात नीलम चित्रपटगृहाच्या काचा फुटल्या. या वेळी जमावाने अन्य काही ठिकाणी दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 

राजपूत समाजाचा चित्रपटास असणारा विरोध लक्षात घेऊन पोलिसांनी गुरुवारी समाजातील प्रतिष्ठित व्यक्‍तींसाठी खास शो चे आयोजन करण्यात आले होते. सकाळी साडेअकरा वाजता या शोला सुरुवात झाली. यावेळी राजपूत समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चित्रपट संपल्यानंतर राजपूत समाजाचे प्रतिष्ठित नागरिक, माजी नगरसेवक खुशालसिंह ठाकूर व नगरसेवक बाला परदेशी यांनी पद्मावत चित्रपटात आक्षेपार्ह असे काहीही नसल्याचे सांगितले. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस बंदोबस्तामुळे रत्नदीप चित्रपटगृृहास छावणीचे स्वरूप आले होते. 

शहरातील नीलम, रत्नदीप व नटराज या तीनही चित्रपटगृहांत त्यानंतर पद्मावत चित्रपटाचे खेळ सुरू झाले. या प्रकरणी गोंधळ घालण्याच्या संशयावरून महाराणा ब्रिगेडचे धनसिंह सूर्यवंशी, ईश्‍वर बिल्होरे यांच्यासह आठ जणांना पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले.  या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक परदेशी हे करीत आहेत. 

चित्रपटगृहांना छावणीचे स्वरूप
पोलिस बंदोबस्तात ‘पद्मावत’चे खेळ सुरू झाले. मात्र पोलिसांचा मोठा फौजफाटा असल्याने चित्रपटगृहांना छावणीचे स्वरूप आले होते. गुरुवारी पुकारण्यात आलेल्या शहर बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. शिवाजी पुतळा येथून पद्मावत विरोधात रॅली काढणार्‍या काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जिल्हा पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलिस अधीक्षक लता फड यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी गुरुवारी चित्रपटगृहात उपस्थित होते.