Tue, Feb 19, 2019 20:23होमपेज › Jalna › जिल्ह्यात बेरोजगारांची संख्या अवघी ५४ हजार !

जिल्ह्यात बेरोजगारांची संख्या अवघी ५४ हजार !

Published On: Feb 18 2018 1:57AM | Last Updated: Feb 18 2018 1:57AMजालना : आप्पासाहेब खर्डेकर

बेकारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. नोकरीचे प्रमाण कमी व उमेदवारांची संख्या अधिक, असे चित्र सगळीकडेच आहे. नोकरी मिळेल या आशेपोटी जिल्हा कौशल्य विकास व स्वयंरोजगार कार्यालयात 54 हजार सुशिक्षित बेरोजगारांनी नोंदणी केली आहे. मात्र 1 हजार 41 तरुणांनाच या कार्यालयाद्वारे रोजगार प्राप्त झाला आहे. 

केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने शासकीय नोकर भरतीत कपात केल्याने दिवसेंदिवस बेरोजगारीत वाढ होत आहे. स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सप्टेंबर 2015 मध्ये स्व. प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान सुरू करण्यात आले. जिल्हा कौशल्य व विकास स्वयंरोजगारात ऑनलाइन नोंदणीचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नोकरीचे प्रमाण कमी झाल्याने अनेक जण नोंदणीही करीत नाहीत. 

शासनाच्या वतीने अनेक प्रकारची नोकर भरती केली जाते; परंतु उमेदवारांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे स्पर्धेत टिकण्यासाठी विविध कौशल्ये अंगीकारणे गरजेचे आहे. तेव्हाच स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तरुणांनी कौशल्य विकासाबरोबर आपली प्रो-फाईल वर्षभरातून एकदा अपडेट करावी.

- वि. का. भुसारे,
 सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, 
रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्र

छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान नोकरीऐवजी तरुणांनी उद्योजकतेकडे वळावे,  या उद्देशाने शासनाच्या वतीने 2 फेबु्रवारी 2018 रोजी छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान सुरू करण्यात आले आहे. यात वैयक्तिक कर्ज, व्याज परतावा योजना व गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना आहे. ही योजना कृषी संलग्न व पारंपरिक उपक्रमांसाठी, लघु व मध्यम उद्योगांसाठी (उत्पादन, व्यापार व विक्री) सेवा क्षेत्रासाठी लागू करण्यात आली आहे.