होमपेज › Jalna › शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा वार्‍यावर 

शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा वार्‍यावर 

Published On: Jul 17 2018 1:34AM | Last Updated: Jul 17 2018 12:32AMजालना : प्रतिनिधी

विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या बेकायदेशीर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणत वाढली असून विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. जिल्हा प्रशासन, महापालिका शिक्षण मंडळ, तसेच संबंधित शाळांनी या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. शहर वाहतूक शाखा व उपप्रादेशिक परिवहन विभागाने मात्र (आरटीओ) या बेकायदेशीर वाहतुकीला आळा घालण्यासाठी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

या पार्श्‍वभूमीवर पालक, ऑटोरिक्षाचालक, शहर वाहतूक शाखेचे अधिकारी, आरटीओ  आणि शाळा समिती यांच्या बैठका विविध शाळेतून घेण्यात येत आहे. सोमवारी (दि.16) रोजी आरएचव्ही शाळेत बैठक घेण्यात आली. शहरात शंभरपेक्षा अधिक खासगी  शाळा असून जवळपास पाच हजारांपेक्षा अधिक ऑटोरिक्षा आहे. त्यात लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बहुतांशी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी स्कूल बस आहेत, मात्र या बस विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी योग्य आहेत की नाही, याकडे शाळा प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही. जिल्हाधिकारी यांच्या  अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या शालेय परिवाहन समितीच्या निर्देशांकडे देखील या शाळा दुर्लक्ष करत आहेत.

प्रत्येक शाळेत परिवहन समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक योग्य पध्दतीने होते की नाही, हे तपासण्याची जबाबदारी या समितीची आहे, परंतु अनेक शाळांमध्ये ही समितीच अस्तित्वात नाही. परिणामी सर्व नियम पायदळी तुडवत विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू आहे. वाहतूक शाखेचे काकडे यांनी मात्र विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या बेकायदेशीर वाहनांच्या विरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. आरटीओच्या वतीने सत्तरच्या वरती वाहनांवर कारवाई केली आहे. यापुढे ही कारवाई सुरू राहणार आहे. शाळांना नोटीस देऊन काही शाळा वाहनांची तपासणी करीत नसल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍यांने सांगितले.