Sat, Aug 24, 2019 19:59होमपेज › Jalna › पाऊस रुसला; शेतकर्‍यांच्या डोळ्यांत पाणी

पाऊस रुसला; शेतकर्‍यांच्या डोळ्यांत पाणी

Published On: Jul 04 2018 2:13AM | Last Updated: Jul 04 2018 2:11AMभोकरदन : प्रतिनिधी

तालुका खरीप हंगामासाठीचा म्हणून  ओळखला जातो, मात्र या भागातील शेतकर्‍यांचा खरीप हंगामच आता धोक्यात आला आहे. मृगापाठोपाठ आता आद्रा नक्षत्रदेखील कोरडे गेल्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी येत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत तालुक्यात केवळ 35 ते 40 टक्के पेरण्या झाल्या आहेत. आठ दिवसांत पाऊस पडला नाही तर पेरणी झालेल्या भागात दुबार पेरणीची शक्यता तालुका कृषी खात्याने वर्तविली आहे.

तालुक्यात 1 लाख 3 हजार हेक्टर क्षेत्र खरीप लागवडीसाठी ग्राह्य धरण्यात आले आहे. या पैकी आतापर्यंत केवळ 34 हजार 559 हेक्टरवर कृषी खात्याकडे पेरणी व लागवडीची नोंद आहे. या शिवाय आणखी काही तुुरळक ठिकाणची लागवड ग्राह्य धरली तर केवळ 40 टक्केच पेरण्या झाल्या आहेत. 60 टक्के पेरण्या होऊ शकल्या नाहीत.

खरीप हंगामातील महत्त्वाचे समजल्या जाणारे पहिलेच मृग नक्षत्र कोरडे गेल्याने भिस्त होती ती आद्रा नक्षत्रावर, मात्र आद्रा नक्षत्रदेखील कोरडे जात आहे. या नक्षत्राला संपायला केवळ दोनच दिवस आहेत.त्यामुळे दोन दिवसांत पाऊस पडला तरी मूग आणि उडीद हे पीक आता बाद झाल्यात जमा असल्याचे शेतकरी सांगत आहेत. शुक्रवार (दि. 6) पासून सुरू होणार्‍या पुुनर्वसू नक्षत्राकडे आता नजरा लागल्या आहेत. मागच्या वर्षी निसर्गाने बर्‍यापैकी साथ दिल्याने शेतकरी आनंदीत होते. यावर्षी मात्र जून नंतर जुलै महिन्यातील 4 तारीख उजाडली तरी तरी सर्वदूर पावसाचे आगमन झालेले नाही.